शिवसेनेला केवळ दोन कॅबिनेट मंत्रिपदं, दोन्ही राष्ट्रवादीतून आलेल्या नेत्यांना!

शिवसेनेत असे अनेक नेते आहेत, ज्यांनी तळागाळातील शिवसैनिक म्हणून आपली राजकीय सुरुवात केली आणि चार-चार किंवा पाच-पाच वेळा आमदार आहेत. मात्र, त्यांना मंत्रिपद न देता, गेल्या काही वर्षात शिवसेनेत प्रवेश केलेल्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी संधी दिली आहे.

शिवसेनेला केवळ दोन कॅबिनेट मंत्रिपदं, दोन्ही राष्ट्रवादीतून आलेल्या नेत्यांना!

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होत असून, यात एकूण 13 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यात भाजपचे 10, शिवसेनेचे 2 आणि रिपाइं-आठवले गटाचे एक मंत्री शपथ घेतील. विशेष म्हणजे, शिवसेनेला केवळ दोन मंत्रिपदं मिळणार आहेत, ती दोन्ही मंत्रिपदं कॅबिनेट असतील. शिवसेनेच्या कोट्यातील दोन्ही कॅबिनेट मंत्रिपदं राष्ट्रवादीतून आलेल्या नेत्यांनाच मिळणार आहेत.

बीडमधील नेते जयदत्त क्षीरसागर आणि यवतमाळमधील विधानपरिषदेचे आमदार तानाजी सावंत यांना शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. विशेष म्हणजे, जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले नेते आहेत. जयदत्त क्षीरसागर हे दोन-तीन आठवड्यांपूर्वीच शिवसेनेत आले आहेत, तर तानाजी सावंत यांनी 2015 साली शिवसेनेत प्रवेश केला.

क्षीरसागर आणि सावंत या दोघांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन शिवसेना आयारामांना थेट कॅबिनेटपदी विराजमान करुन, पक्षात वर्षानुवर्षे काम करत असणाऱ्यांवर अन्याय करत असल्याची भावना सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये आहे.

शिवसेनेत असे अनेक नेते आहेत, ज्यांनी तळागाळातील शिवसैनिक म्हणून आपली राजकीय सुरुवात केली आणि चार-चार किंवा पाच-पाच वेळा आमदार आहेत. मात्र, त्यांना मंत्रिपद न देता, गेल्या काही वर्षात शिवसेनेत प्रवेश केलेल्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी संधी दिली आहे.

कोण आहेत जयदत्त क्षीरसागर?

 • राष्ट्रवादी काँग्रेसमधून नुकताच शिवसेनेत प्रवेश
 • बीडच्या केशरकाकू क्षीरसागरांचे पुत्र
 • 2009 मध्ये प्रथम विधानसभेवर निवडून गेले
 • माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री
 • 2014 मध्ये पुन्हा विधानसभेवर निवड
 • विधानसभेतील राष्ट्रवादीचे विधीमंडळातील उपनेते
 • मराठवाड्यात ओबीसीचे राजकारण
 • मुंडे घराण्याशी सलोख्याचा संबंध
 • तौलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यानं मोदींशी संवाद
 • क्षीरसागर कुटुंब उच्चशिक्षित म्हणून प्रसिद्ध

तानाजी सावंत कोण आहेत?

 • यवतमाळमधून शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार
 • 2015 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत
 • खासगी साखरसम्राट आणि शिक्षणसम्राट अशी ओळख
 • उस्मानाबादच्या राजकारणावर चांगली पकड
 • कोणतेही मोठे आंदोलन न करता शिवसेनेत मोठे स्थान
 • ‘लक्ष्मी’पुत्र अशी शिवसेनेत खासगीमधली ओळख
 • सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील रहिवासी
 • राष्ट्रवादीचे बबन शिंदेंविरोधात तीनदा निवडणूक लढवली
 • दोनवेळा शिवसेनेकडून निवडणूक लढवली
 • एकदा अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली
 • राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील गटाचे समर्थक म्हणून ओळख

Published On - 10:06 am, Sun, 16 June 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI