भद्रा मारुती माझ्या पाठीशी, दानवेंनी जे केलंय, ते विसरणार नाही : खैरे

भद्रा मारुती माझ्या पाठीशी, दानवेंनी जे केलंय, ते विसरणार नाही : खैरे

औरंगाबाद : परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मीच विजयी होईन, असा विश्वास शिवसेनेचे औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जे काही केलंय, ते माझ्या जीवाला लागलंय, ते मी कधीही विसरणार नाही, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी जाहीरपणे पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रकांता खैरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास बातचीत केली.

चंद्रकांत खैरे नेमकं काय म्हणले?

“परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मीच विजयी होईन. भद्रा मारुती, दक्षिणमुखी मारुती, राजूरचा गणपती आणि शनिशिंगणापूरचा शनी माझ्या पाठीशी आहेत. दक्षिणमुखी मारुतीसमोर असलेला यज्ञ अजूनही सुरु आहे. मोठ्या उत्साहात मी यज्ञाची सांगता करणार आहे.” असे शिवसेनेचे औरंगाबादचे उमेदवार चंद्रकांत खैरे म्हणले.

दानवेंसह हर्षवर्धन जाधवांवर खैरेंचं टीकास्त्र

“भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जे काही केलंय, ते माझ्या जीवाला लागलंय, ते मी कधीही विसरणार नाही. त्यांच्या जावयाबद्दल मला काहीच बोलायचं नाही. जो स्वतःच्या बापाला मारु शकतो, त्याचा पराभव होणे हेच गरजेचे होते.” असे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई व औरंगाबादमधील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यावर घणाघात केला.

“दानवेंचा पक्ष त्यांच्यावर काय कारवाई करायचं तो करेल, मी तक्रार करायचं माझं काम केलं आहे. मोदी हे खूप कडक आहेत.” असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

खैरे-दानवे वाद नेमका काय आहे?

रावसाहेब दानवे यांनी युती धर्म न पाळता जावई हर्षवर्धन जाधव यांना मदत केली, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला होता. तसेच, “दानवेंनी प्रचाराच्या काळातच औरंगाबादच्या रुग्णालयात उपचाराच्या निमित्ताने पाच-सहा दिवस मुक्काम केला आणि राजकीय भेटीगाठी घेत जावयाला मदत केली. दानवेंना खुश करण्यासाठी औरंगाबादच्या भाजपच्या 8 ते 10 नगरसेवकांनीही आपल्याविरुद्ध हर्षवर्धन जाधव यांचं उघडपणे काम केलं. जाधव यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आपल्याविरुद्ध प्रचार केला. दानवे आणि त्यांचे जावई जाधव यांना आवरा’ अशी तक्रार खैरे यांनी अमित शाह यांना भेटून केली होती.

खैरेंच्या या तक्रारीनंतर भाजपकडून पत्रक जारी करुन प्रतिक्रिया देण्यात आली होती. “भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठीच काम केलं. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरुन मी स्वतः मतदारसंघात तीन दिवस मुक्काम करुन भाजप पदाधिकाऱ्यांसह प्रचार केला”, असं भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी म्हटलं होतं.


Published On - 12:39 pm, Tue, 21 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI