Sanjay Raut : खोकी मिळाली म्हणजे झोप लागतेच असं नाही, संजय राऊत कडाडले, ही शिवसैनिकांची हाय आहे!
Sanjay Raut : भाजपने शिवसेना संपवण्यासाठी भाजपने जंगजंग पछाडलं. त्यांना शिवसेना संपवता आली नाही. तेव्हा शिवसेना फोडण्यासाठी कोट्यवाधी रुपये टाकले.

नाशिक: बांद्यापासून चांद्यापर्यंत फाटक्या शिवसैनिकांनी (shivsena) या धनिकांचा पराभव केला आहे. हा इतिहास आहे. त्या इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. ते तिथे गेलेत. पण ते स्वस्थ नाहीयेत. त्यांना झोप लागत नाहीये. खोकी मिळाली म्हणून झोप लागते असं नाही. शिवसैनिकांची हाय आहे. बाळासाहेबांचा आत्मा बघतोय वरून. नुसता फोटो लावला बाळासाहेबांचा आणि आमचे म्हटल्यावर आमचे होत नाहीत. त्यांनी आशीर्वाद द्यावा लागतो. ही पवित्र भूमी आहे. त्यावर आक्रमण चालत नाही. असे आक्रमण येतात आणि जातात. आमच्यात जिगर आहे. आम्ही शिवसैनिक आहोत, असं शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) म्हणाले. संजय राऊत आज नाशिकमध्ये आहेत. शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांसहीत भाजपवर (bjp) जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शिवसैनिक टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद देत होते.
भाजपने शिवसेना संपवण्यासाठी भाजपने जंगजंग पछाडलं. त्यांना शिवसेना संपवता आली नाही. तेव्हा शिवसेना फोडण्यासाठी कोट्यवाधी रुपये टाकले. ईडीचा दबाव टाकला. शेवटी शिवसेना फोडली. फक्त आमदार फुटले. सेना नाही फुटली. 40 आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं. जळगावपासून ते मालेगावपर्यंत पुन्हा एकदा निवडून येऊन दाखवा. हा शिवसैनिक तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला.
आमचं हायकमांड मातोश्री
मुख्यमंत्री दिल्लीत गेले. त्यांचं हायकमांड दिल्लीत आहे. आमचं मातोश्रीत आहे. आमची माती आमची माणसं. आम्ही लाल किल्ल्याला सलाम मारत नाही. आम्ही रायगडाला सलाम करतो. हायकमांडला भेटायला दिल्लीत गेले आणि म्हणाले मी शिवसैनिक. शिवसैनिक कधी दिल्लीतील हायकमांडकडे जात नाही. मराठी माणसाचं हायकमांड मातोश्री, महाराष्ट्राचं हायकमांड मातोश्री आहे. या दिल्लीने महाराष्ट्रावर सतत अन्याय केला. आम्ही त्यांच्याशी संघर्ष केला. मुंबई मिळवली. म्हणून त्यांना आता पुन्हा शिवसेना तोडली. म्हणजे मुंबई तोडणे सोपे जाईल. मराठी माणूस कमजोर केला. प्राणांची बाजू लावून महाराष्ट्र तुटू देणार नाही. बाळासाहेब तेव्हा बोलले होते. फुटेल त्याला रस्त्यावर तुडवा. उद्धव ठाकरेंनी तर काही सांगितलं नाही, असंही ते म्हणाले.
आमदार होण्याची लायकी होती का?
आपल्याकडचे दोन लोकं गेलेत त्यांच्याकडे. आमदार होण्याची लायकी होती का? शिवसेना ही चार अक्षरे नसती, हजारो शिवसैनिकांनी रक्त आणि घाम दिला नसता तर नगरपंचायतीत निवडून येणं मुश्किल झालं असतं. तुम्हाला मंत्री केलं आणि मान सन्मान प्रतिष्ठा दिली. कोण होतो आपण? तुम्ही एका रात्रीत पळून गेला उद्धव ठाकरेंच्या पाठित खंजीर खुपसून. उद्धव ठाकरे आजारी असताना आणि महाराष्ट्राची प्रकृती बिघडलेली असताना पळून गेला. उद्धव ठाकरे कोरोना काळात लोकांचे जीव वाचवत होते. लोकांना धीर देत होते आणि म्हणता ते भेटत नव्हते? ते काम करत नव्हते? आणि उद्धव ठाकरे शेवटच्या चार महिन्यात आजारी पडले त्याचा गैरफायदा होऊन बाहेर पडला, असा हल्लाबोल त्यांनी केला.
बुडाला आग लागवल्याशिवाय राहणार नाही
आता म्हणतात आमची शिवसेना खरी. अरे धनुष्यबाण आमचा पंचप्राण आहे. लाखो शिवसैनिकांचे पंचप्राण असे घेता येणार नाही. धनुष्यबाण शिवसेनेचाच राहील आणि आवाजही शिवसेनेचाच राहील. हा अंगार राज्यात पेटला तर विझवताना कठिण जाईल. एक तर महाराष्ट्र पेटत नाही, पेटला तर विझत नाही. नाशिक तर फक्त आदेशाची वाट पाहत आहे. जरा त्यांची बुडं नीट बसू द्या. मग बुडाला आग लागल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
