VIDEO | अंगात चुडैल घुसली की काय? भानुमतीच्या भक्ताकडे न्यायला हवं, गुलाबराव नारायण राणेंवर बरसले
राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत काय बोलावे, याचे त्यांना भान नसेल, तर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले पाहिजे, वेळ पडली तर त्यांना शॉक सुद्धा दिले पाहिजे" असंही गुलाबराव म्हणाले.

जळगाव : माजी मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री असलेल्या व्यक्तीने विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या बाबत काय बोलावे याचे भान ठेवले पाहिजे, मात्र हे भान हरपलेल्या नारायण राणे (Narayan Rane) यांना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करून शॉक दिला पाहिजे, अशी टीका शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केली आहे. यांच्या अंगात काय चुडैल घुसली की काय, असं गुलाबराव म्हणाले.
गुलाबराव पाटील काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोलताना ‘मी असतो तर त्यांच्या कानात लगावली असती’ असे वक्तव्य केले होते. त्यावर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपदाची गरिमा काय असते, याची माहिती आहे. मुख्यमंत्री हा कोणत्याही एका पक्षाचा नसतो, तो संपूर्ण राज्याचा असतो. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत काय बोलावे, याचे त्यांना भान नसेल, तर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले पाहिजे, वेळ पडली तर त्यांना शॉक सुद्धा दिले पाहिजे” असं गुलाबराव म्हणाले.
“अंगातील भूत उतरवा”
नारायण राणे, शरद पवार, विलासराव देशमुख हेसुद्धा प्रगतशील राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळीही विरोधी पक्ष होते, त्यावेळी त्यांच्याकडे एक गरिमा होती. परंतु आता गरिमा नसलेले भूत येथे आलं आहे. मला तर वाटते यांच्या अंगात काय चुडैल घुसली की काय. यांना भानुमतीच्या भक्ताकडे नेलं पाहिजे आणि यांच्या अंगात काय घुसलंय पाहायला पाहिजे, असंही गुलाबराव म्हणाले.
“राणेंची मला कीव येते”
नारायण राणे यांनी वक्तव्याबाबत माफी मागण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त करुन गुलाबराव पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांची माफी मागण्याचीही लायकी राणे यांची नाही, बोलताना आपण काय बोलतो याचा त्यांनी विचार करावा, कामाच्या बाबतीत टीका जरुर करावी, सरकारच्या अपयशाबद्दल भूमिका मांडावी, पण काय बोलावं, हे शिकवायचं असेल, तर नारायण राणेंची मला कीव येते, असं गुलाबराव म्हणाले.
पाहा व्हिडीओ :
नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?
नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हीरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.
संबंधित बातम्या :
मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, नारायण राणेंना अटक करा, नाशिक पोलीस आयुक्तांचे निर्देश
“कोंबडी चोर !!!” नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांचा संताप, दादरमध्ये डिवचणारे पोस्टर
Video : ‘मी असतो तर कानाखाली चढवली असती’, मुख्यमंत्र्यांवर बोलताना राणेंची जीभ घसरली
