अमित शाहांचा राणेंना फोन, राजकीय घडामोडींना वेग, संजय राऊत मुंबईत परतणार

| Updated on: Aug 26, 2021 | 11:25 AM

Sanjay Raut | भाजपचे चाणक्य अमित शाह यांनी नुकताच फोनवरुन नारायण राणे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे आता भाजप नारायण राणे यांच्यावरील कारवाईचा वचपा काढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

अमित शाहांचा राणेंना फोन, राजकीय घडामोडींना वेग, संजय राऊत मुंबईत परतणार
संजय राऊत, खासदार, शिवसेना
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप नेते नारायण राणे यांना शिवसेनेने इंगा दाखवल्यानंतर आता दोन्ही पक्षांमध्ये तीव्र संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे सध्या मुंबई आणि दिल्लीत घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. भाजपचे चाणक्य अमित शाह (Amit Shah) यांनी नुकताच फोनवरुन नारायण राणे (Narayan Rane) यांच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे आता भाजप नारायण राणे यांच्यावरील कारवाईचा वचपा काढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनाही सावध झाली आहे. भाजपच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देण्यासाठी शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ असलेल्या खासदार संजय राऊत यांना तातडीने मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहे. संजय राऊत हे सध्या भुवनेश्वरच्या दौऱ्यावर होते. मात्र, गेल्या दोन दिवसांमधील घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय चित्र कमालीचे पालटले आहे. त्यामुळे संजय राऊत गुरुवारी तातडीने मुंबईत परतणार आहे. मुंबईत आल्यानंतर संजय राऊत प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता संजय राऊत भाजपचा हल्ला कसा परतावून लावणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अमित शाह राणेंशी फोनवर काय बोलले?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील नारायण राणे (Narayan Rane) यांना नुकताच फोन केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी अमित शाह यांनी नारायण राणे यांची विचारपूस केली. तसेच पोलीस कारवाई आणि अटकेचा कारवाईबाबतचे तपशीलही अमित शाह यांनी नारायण राणे यांना विचारल्याचे समजते. भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी ही माहिती दिली.

संजय राऊत संपादक पदासाठी लायक नाहीत, राणेंचा घणाघात

‘सामना’तील अग्रलेखावरून नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना ‘संजय राऊत हे संपादक पदाच्या लायकीचे नाहीत. ते फक्त उद्धव ठाकरे खूश व्हावे इतकंच लिहितात. मी त्यांना 17 तारखेनंतर उत्तर देईन’, असा इशारा राणे यांनी दिला होता.

राणेंचा ‘त्या’ मंत्र्याला आणि अनिल परबांना इशारा

अनिल परब अधिकाऱ्यांना आदेश देतो की पकडा त्याला. अरे काय सुरु आहे. दिशा सालियान प्रकरणात कोण मंत्री उपस्थित होता? त्याचा छडा का लागत नाही. पूजा चव्हाण प्रकरणातही तेच झालं. आता त्या मंत्र्याला अटक होईपर्यंत मागे हटणार नाही. त्या मंत्र्याविरोधात कोर्टात जाणार. लोकशाही मार्गानं लढा देणार. ज्यांनी दिशा सालियानची हत्या केली, ते आत जाईपर्यंत आता स्वस्थ बसणार नाही, अशा सूचक इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. अनिल परब यांच्या प्रकरणातही चौकशी सुरु आहे, त्याचाही आता पाठपुरावा सुरु राहील, असंही राणेंनी म्हटलंय. काही गोष्टी करायला हे प्रवृत्त करत आहेत. फार सभ्य आहेत ना, काहीच करत नाहीत ना, आता जनतेला त्यांची करामत कळू द्या, अशा कडक शब्दात राणेंनी शिवसेनेवर हल्ला चढवलाय.

संबंधित बातम्या:

राणेंनी स्वतःला महान समजणं बंद केलं तरी त्यांच्या आयुष्यातील समस्या औषधांशिवाय बऱ्या होतील, सामनातून राणेंवर पुन्हा हल्लाबोल

नारायण राणे फार दिवस मंत्रिमंडळात राहणार नाही, सामनाच्या अग्रलेखातले 5 स्फोटक मुद्दे

राणेंवरील कारवाईनंतर नाशिक भाजप आक्रमक, मुख्यमंत्री आणि संजय राऊतांविरोधात 3 तक्रार अर्ज