ठाकरेंची डरकाळी, शिंदेंची ललकारी ते संघांचं मंथन; उद्याच्या दसरा मेळाव्याचे पाच महत्त्वाचे कार्यक्रम कोणते?

भीमराव गवळी, Tv9 मराठी

|

Updated on: Oct 04, 2022 | 9:51 AM

शिवसेनेला शिवाजी पार्कचं मैदान मिळू नये म्हणूनही बंडखोरांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे शिवसेनेला कोर्टात जावून मैदानाची परवानगी मिळवावी लागली.

ठाकरेंची डरकाळी, शिंदेंची ललकारी ते संघांचं मंथन; उद्याच्या दसरा मेळाव्याचे पाच महत्त्वाचे कार्यक्रम कोणते?
उद्याच्या दसरा मेळाव्याचे पाच महत्त्वाचे कार्यक्रम कोणते?
Image Credit source: tv9 marathi

मुंबई: राज्यासाठी उद्याचा दिवस अत्यंत धामधुमीचा आणि राजकीय धुरळ्याचा ठरणार आहे. उद्या दसरा असल्याने राज्यभरात चांद्यापासून ते बांद्यापर्यंत जल्लोष असणार आहे. तर मुंबईपासून नागपूरपर्यंत राजकीय फटाके फुटणार आहेत. उद्या मुंबईत दोन्ही शिवसेनेचा दसरा मेळावा (dussehra rally) होणार आहे. मुंबईत उद्धव ठाकरेंची (uddhav thackeray) डरकाळी घुमणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांचीही ललकारी ऐकायला मिळणार आहे. तर नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार तसेच दीक्षाभूमीवर बुद्धं सरणं गच्छामीचा जयघोष ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे या रॅली आणि सभांकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

रेशीम बाग: नागपूरच्या रेशीम बागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सकाळीच दसऱ्याचा कार्यक्रम होईल. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रांचं पूजन करण्यात येईल. त्यानंतर भागवत हे स्वयंसेवकांना संबोधित करतील.

या कार्यक्रमाला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी भागवत काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

दीक्षाभूमी: नागपूरच्या दीक्षाभूमीवर उद्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम होणार आहे. दसऱ्याच्या दिवशीच संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळे या दिवशी देशविदेशातील हजारो आंबेडकर अनुयायी दीक्षाभूमीवर येत असतात.

उद्या दीक्षाभूमीवर दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल असेल. संध्याकाळी या ठिकाणी सभेचं आयोजन केलं जात. त्याशिवाय देशभरातही धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे कार्यक्रम होत असतात.

पंकजा मुंडे: भाजपच्या फायर ब्रँड नेत्या पंकजा मुंडे या उद्या बीडच्या सावरगावमध्ये दसऱ्या निमित्ताने आपल्या समर्थकांना संबोधित करतील. पंकजा मुंडे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी सावरगाव येथे सभा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असतात.

यावेळी त्यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही. खासदार प्रीतम मुंडे यांनी पंकजा मुंडे मंत्रिमंडळात हव्या होत्या अशी इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळे पंकजा मुंडे उद्या काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरे: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. दरवर्षी शिवाजी पार्कावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतो. यावेळी शिवसेनेत फूट पडली आहे. शिवसेनेचे 40 आमदार फुटले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते.

त्यानंतर बंडखोरांनी भाजपशी हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली. शिवसेनेला शिवाजी पार्कचं मैदान मिळू नये म्हणूनही बंडखोरांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे शिवसेनेला कोर्टात जावून मैदानाची परवानगी मिळवावी लागली. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एकनाथ शिंदे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाही उद्या दसरा मेळावा होणार आहे. बीकेसी मैदानावर हा मेळावा होणार आहे. शिंदे यांनी शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे गटाचा दसरा मेळावा होत आहे.

यावेळी शिंदे गटाकडून मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. आमचीच शिवसेना खरी असल्याचं दाखवण्याचा यावेळी प्रयत्न होणार आहे. त्यामुळे शिंदे या मेळाव्यात काय बोलतात याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI