AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“नुसती तलवार, वाघनखे इतिहास घडवीत नाहीत तर…”, संजय राऊतांचा घणाघात

ज्या राज्यकर्त्यांनी शिवरायांच्या महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीचरणी गहाण टाकला आहे व जे रोज उठून दिल्लीस मुजरे झाडत आहेत त्यांना शिवरायांच्या वाघनखांची उठाठेव करण्याचा नैतिक अधिकार उरला आहे काय? असा प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केला.

नुसती तलवार, वाघनखे इतिहास घडवीत नाहीत तर..., संजय राऊतांचा घणाघात
| Updated on: Jul 22, 2024 | 9:05 AM
Share

Sanjay Raut On Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakh : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त गेल्या वर्षभरापासून उत्सुकता असलेली वाघनखे कडक बंदोबस्तात साताऱ्यात दाखल झाली आहेत. ही वाघनखे श्री छत्रपती शिवछत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून आणलेली वाघनखे शिवभक्तांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. आता या वाघनखांवरुन राजकीय आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वाघनखांवरुन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

“महाराष्ट्र लुटणाऱ्यांचे, मराठी स्वाभिमानाची माती करणाऱ्यांचे बूट चाटणाऱ्या नकली वाघांनी ‘वाघनखे’ आणली. त्या वाघनखांसाठी राजकीय जत्रा भरवली. तलवार आणि वाघनखांनी इतिहास घडविला जातो. नुसती तलवार, वाघनखे इतिहास घडवीत नाहीत”, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. ‘सामना’ या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून यावर टीका करण्यात आली.

“ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट”

“लंडनच्या व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियममधून राज्य सरकारने वाघनखे आणली आहेत. ही वाघनखे ऐतिहासिक खरी, पण चोरांचे सरकार दावा करत आहे, त्याप्रमाणे अफझल खानाचा वध करण्यासाठी शिवरायांनी वापरलेली वाघनखे ती हीच का? याबाबत इतिहास संशोधकांच्या मनात शंका आहे. लंडनच्या ज्या म्युझियममधून ही वाघनखे महाराष्ट्रात आणली त्या म्युझियमला ही वाघनखे छत्रपती शिवरायांचीच याबाबत खात्री नाही, पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या छत्रपतींच्या वाघनखांचा ‘जुमला’ चोरांच्या सरकारने करावा, ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

“मोदी, मिंधे, फडणवीसांकडून महाराष्ट्राच्या भावनांचा अपमान”

बऱ्याच वर्षांपूर्वी शिवरायांची भवानी तलवार इंग्लंडच्या राणीच्या म्युझियममधून महाराष्ट्रात आणायचा प्रचारकी जुमला झालाच होता. आता मिंधे-फडणवीसांनी वाघनखांचा वापर सुरू केला. ही लंडनवरून आणलेली वाघनखे महाराष्ट्रात ठिकठिकाणी फिरवून त्या सोहळय़ाचे राजकारण केले जाणार आहे. पंतप्रधान मोदी व त्यांच्या लोकांनी मागच्या निवडणुकीत शिवरायांचा वापर केला. शिवरायांच्या बरोबरीने मोदींचे फोटो छापले. त्यानंतर मोदी हे विष्णूचे अवतार बनले व प्रत्यक्ष प्रभू श्रीरामाचे बोट धरून ते रामास अयोध्येतील नव्या मंदिरात घेऊन जात आहेत, अशी पोस्टर्स झळकली; पण अयोध्येतच मोदींचा पराभव झाल्याने मोदी यांनी राजकीय यश मिळालेल्या ओडिशातील भगवान जगन्नाथाचे नामस्मरण सुरू केले. शिवराय व श्रीराम मागे पडले. मोदी, मिंधे, फडणवीस आता ‘वाघनखां’ची हवा उठवून महाराष्ट्राच्या भावनांचा अपमान करीत आहेत.

“लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यांच्या पोटात वाघनखे खुपसल्याने…”

वाघनखांचे निमित्त करून छत्रपती शिवरायांच्या नावाने आपले राजकीय नाणे ते वाजवू पाहत आहेत. हे क्लेशदायक आहे. औरंगजेबाच्या काळातही शिवरायांची जेवढी अवहेलना झाली नव्हती इतकी मिंधे-फडणवीस वगैरे लोकांनी शिवरायांचा बाजारी उपयोग करून केली. महाराष्ट्रात फसवणुकीचे राजकारण कोणत्या थरापर्यंत पोहोचले आहे त्याचे उदाहरण म्हणजे लंडनहून आणलेली वाघनखे. इतिहासकारांची मते वाघनखांच्या बाबतीत वेगळी आहेत व ती समोर आली आहेत, पण इतिहासाशी ‘ओ’ की ‘ठो’ संबंध नसणाऱ्यांच्या हाती राज्याची सूत्रे असल्याने त्यांनी इतिहासाचे विडंबन चालवले आहे. मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी सर्वच बाबतीत इतिहास पुसण्याचे ठरवले आहे. शिवरायांच्या शौर्यगाथेत वाघनखांना महत्त्व आहेच, पण चोरांचे सरकार व नकली सरदार म्हणतील तीच वाघनखे खरी हे मान्य करता येणार नाही. मिंधे व फडणवीस या दुकलीने महाराष्ट्राचा इतिहास पिसाळ-खोपडय़ांच्या मानसिकतेने मांडायला घेतला आहे. त्यामुळे त्यांना कावळय़ांना मोर व कोल्हय़ांना वाघ ठरविण्याची घाई झाली आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या पोटात वाघनखे खुपसल्याने त्यांचे विव्हळणे संपलेले नाही, अशी टीकाही संजय राऊतांनी केली.

“शिवरायांच्या वाघनखांची उठाठेव करण्याचा नैतिक अधिकार उरला आहे का?”

मुख्यमंत्री मिंधे म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांना नकली वाघनखे म्हणणाऱ्या नकली नेत्यांना असली वाघनखांचे महत्त्व कसे कळणार? तर फडणवीस यांची बालबुद्धी ही ‘‘विरोधकांची नियत नकली आणि बुद्धीही नकली,’’ असे म्हणण्यापलीकडे सरकली नाही. मुळात वाघनखे नकली असे कोणीच म्हणत नाही, पण ‘चोरांच्या मनात चांदणे’ तसे मिंधे-फडणवीसांचे झाले आहे! ही वाघनखे खरेच शिवरायांनी वापरलेली आहेत काय? असा प्रश्न इंद्रजित सावंत यांच्यासारख्या इतिहास संशोधकांनी विचारला व सावंत यांनी त्यांच्या शंकेला पूरक असे पुरावे लोकांसमोर मांडले. त्यात मिंधे-फडणवीस यांना मिरच्या झेंबायचे कारण काय? मुळात ज्या राज्यकर्त्यांनी शिवरायांच्या महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीचरणी गहाण टाकला आहे व जे रोज उठून दिल्लीस मुजरे झाडत आहेत त्यांना शिवरायांच्या वाघनखांची उठाठेव करण्याचा नैतिक अधिकार उरला आहे काय? असा प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केला.

मिंधे-फडणवीस, अजित पवार हे नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवराय आणि अमित शहा यांना संभाजीराजे समजत आहेत, पण महाराष्ट्र हा खऱ्या शिवरायांचा भक्त आहे. त्यामुळे गुजरातच्या व्यापारी राज्यकर्त्यांपुढे तो झुकणार नाही. शिवरायांनी सुरतेवर स्वारी का केली? याचा ज्वलंत इतिहास मिंधे-फडणवीसांनी चाळला पाहिजे. गुजरातचे व्यापारी राज्यकर्ते आज मुंबई-महाराष्ट्र लुटत असताना मिंधे-फडणवीस त्यांच्या बोटांच्या नखांनी साधे डोके खाजवायला तयार नाहीत, तेथे यांनी शिवरायांच्या वाघनखांवर बोलावे हे गमतीतेच आहे. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबई गुजरातच्या उद्योगपतींना आंदण दिली जात असतानाही ज्यांच्या बोटांची नखे शिवशिवत नाहीत ते आता वाघनखांवर प्रवचने झोडत आहेत. महाराष्ट्र लुटणाऱ्यांचे, मराठी स्वाभिमानाची माती करणाऱ्यांचे बूट चाटणाऱ्या नकली वाघांनी ‘वाघनखे’ आणली व त्या वाघनखांसाठी राजकीय जत्रा भरवली.

“वाघनखे आणूनही गुजरातचे व्यापारी…”

तलवार आणि वाघनखांनी इतिहास घडविला जातो. नुसती तलवार, वाघनखे इतिहास घडवीत नाहीत. तलवारीची मूठ व वाघनखे ज्याच्या हाती ती मूठ, तो हात इतिहास घडवतो. राज्याच्या लाचार मिंधे-फडणवीसांच्या हाती वाघनखे शोभत नाहीत. वाघनखे आणूनही गुजरातचे व्यापारी मुंबई-महाराष्ट्र लुटतच आहेत व या लोकांनी शिवछत्रपतींना वेठीस धरून वाघनखांची जत्रा भरवली आहे. ही वाघनखे उद्याच्या विधानसभेत यांच्याच कोथळय़ात घुसतील!, असेही संजय राऊत यांनी यावेळी म्हटले.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.