Mahayuti Nashik Loksabha Candidate : महायुतीमध्ये प्रतिष्ठेच्या बनलेल्या नाशिकमधून अखेर उमेदवाराची घोषणा

Mahayuti Nashik Loksabha Candidate : महायुतीमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभेची जागा प्रतिष्ठेचा मुद्दा बनली होती. नाशिकमधून उमेदवारीसाठी दररोज वेगवेगळी नाव पुढे येत होती. अखेर नाशिकमधून आज उमेदवारीची घोषणा झाली आहे. बरेच मतभेद, सस्पेन्स नंतर नाशिकचा महायुतीचा उमेदवार जाहीर झाला आहे.

Mahayuti Nashik Loksabha Candidate : महायुतीमध्ये प्रतिष्ठेच्या बनलेल्या नाशिकमधून अखेर उमेदवाराची घोषणा
eknath shinde
| Updated on: May 01, 2024 | 1:16 PM

महायुतीमध्ये प्रतिष्ठेच्या बनलेल्या नाशिक लोकसभा जागेचा तिढा अखेर सुटला आहे. नाशिकची जागा कोणाला मिळणार? याबद्दल मागच्या महिन्याभरापासून विविध अंदाज वर्तवले जात होते. नाशिक लोकसभेच्या जागेवर शिवसेना शिंदे गट, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीमधील तिन्ही पक्षांकडून दावा सांगितला जात होता. छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार असं सुद्धा बोललं जात होतं. पण आज अखेर 1 मे महाराष्ट्र दिनी नाशिक लोकसभेचा तिढा सुटला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळीच आज नाशिकचा उमेदवार जाहीर होईल असं म्हटलं होतं. त्यानुसार आज दुपारी उमेदवारीची घोषणा झाली आहे. नाशिक लोकसभेची जागा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मिळाली आहे. महायुतीने इथून हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. मागच्या दोन टर्मपासून नाशिकमधून हेमंत गोडसे खासदार आहेत.

नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु होती. हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. त्यांनी अनेकदा वर्षा निवासस्थानी येऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतली. शक्ती प्रदर्शन केलं. त्यानंतर ही उमेदवारी मिळालीय. नाशिकमध्ये स्थानिक पातळीवर भाजपाची प्रचंड ताकद वाढली आहे. त्यांचे आमदार, नगरसेवक आहेत. त्यामुळे नाशिकच्या जागेवर भाजपाकडून दावा सांगितला जात होता. छगन भुजबळही नाशिकमधून येणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत. त्यांच्या नावाचीही बरीच चर्चा झाली. पण अखेर ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाली.


भाजप प्रदेशाध्यक्षाकडून भुजबळांची भेट

आज उमेदवारी जाहीर होण्याआधी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म या कार्यालयात चंद्रशेखर बावनकुळे आले होते. काल गिरीश महाजनांनी भेट घेतल्यानंतर आज चंद्रशेखर बावनकुळे भुजबळांच्या भेटीला आले होते.