निवडणुकीवरून अजितदादा गट आणि शिंदे गटात जुंपणार? रामदास कदम यांचा गंभीर आरोप काय?

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी योगेश कदम यांच्या विरोधात निवडणुकीत काम केल्याचा गंभीर आरोप कदम यांनी केला आहे. त्यामुळे आता अजित पवार गट यावर काय भाष्य करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

निवडणुकीवरून अजितदादा गट आणि शिंदे गटात जुंपणार? रामदास कदम यांचा गंभीर आरोप काय?
ramdas kadam
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 02, 2025 | 1:51 PM

विधानसभेच्या निवडणुका संपल्या असल्या तरी या निवडणुकीत मित्र पक्षांनी काही ठिकाणी घेतलेल्या असहकार्यावरूनची धुसफूस अजूनही सुरूच आहे. आता यात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उडी घेतली आहे. अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीच्या 90 टक्के कार्यकर्त्यांनी निवडणुकीत योगेश कदम यांचं कामच केलं नाही, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. तसेच याबाबतची लेखी तक्रार देणार असल्याचंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या मुद्द्यावरून शिंदे आणि अजितदादा गटात आगामी काळात चांगलीच जुंपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेना नेते रामदास कदम यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त आहे. विधानसभा निवडणुकीवेळी अनेकजणांनी राष्ट्रवादी सोडली आणि उबाठाचं काम केलं. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचा उजवा हात असलेल्यांच्या गावात योगेश कदमला मते मिळाली नाही. याची माहिती मी सुनील तटकरे यांना देणार आहे. पण आमचे तटकरेंसोबत मतभेद नाही. आमची नाराजी नाही. योगेश कदमला पाडावं, असं सुनील तटकरेंच्या मनात असं कधी येणार नाही. कधीच त्यांच्या मनात असं येणार नाही. पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी मग मंडणगडचा तालुका प्रमुख असो, दापोलीचा तालुका प्रमुख असो यांनी योगेशसाठी कम केलं नाही. आज आणखी बोलायचं नाही. पण राष्ट्रवादीच्या 90 टक्के लोकांनी योगेश कदम यांचं काम केलं नाही. याबाबत मी लेखी तक्रार तटकरेंकडे करणार आहे. त्यांनी दखल घ्यावी, असं रामदास कदम म्हणाले.

आमचं सख्य कायम

यावेळी रामदास कदम यांनी ठाकरे गटावरही टीका केली. भाजपसोबत आमचे भाऊबंदकीचे संबंध आहेत. या निवडणुकीत भाजपचे काही उमेदवार शिवसेनेतून निवडून आणलेत. आम्ही ते काम केलं. आमचे काही उमेदवार भाजपमधूनही निवडून आले. असं सख्य देशात कुठे पाहायला मिळत नाही. हे सख्य कुणाला पाहावत नाही. त्यामुळे आमच्यात मतभेद होतात का हे काहीजण पाहत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

थोडं मन मोठं करा

रामदास कदम यांनी पालकमंत्रीपदावरूनही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सुनील तटकरे यांना मन मोठं करण्याचा सल्ला दिला आहे. पालकमंत्रीपदावरून आपसात मतभेद नको. आपण हातात हात घालून काम केलं पाहिजे. दादांचे उजवे हात सुनील तटकरे यांनी थोडसं मन मोठं केलं पाहिजे. त्यांची मुलगी पाच वर्ष पालकमंत्री होती. ज्या जिल्ह्यात शिवसेनेचे चार पाच आमदार आहे. तिथे शिवसेनेला झुकतं माफ दिलं पाहिजे. थोडं मन मोठं केलं पाहिजे. भरत गोगावले हे सीनिअर आहेत. त्यांना पालकमंत्रीपद दिलं पाहिजे, असं रामदास कदम म्हणाले.