बारणे-जगतापांमध्ये दिलजमाई, पार्थ पवारांसमोर आव्हान वाढलं!

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासमोरील आव्हान आणखी वाढलं आहे. कारण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस होती. मात्र, ही धुसफूस मिटवून समेट घडवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आहे. मावळमध्ये शिवसेनेचे नेते श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत. तर याच …

बारणे-जगतापांमध्ये दिलजमाई, पार्थ पवारांसमोर आव्हान वाढलं!

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासमोरील आव्हान आणखी वाढलं आहे. कारण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस होती. मात्र, ही धुसफूस मिटवून समेट घडवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आहे.

मावळमध्ये शिवसेनेचे नेते श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत. तर याच मतदारसंघात भाजपचे लक्ष्मण जगताप हे श्रीरंग बारणे यांचे विरोधक मानले जातात. बारणेंच्या शिवसेना आणि जगतापांच्या भाजपची युती असली, तरी पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही नेत्यांमधील वाद सर्वश्रुत होता. स्वत: श्रीरंग बारणेंनी अनेकदा जाहीरपणे लक्ष्मण जगतापांवर आरोप केले होते. श्रीरंग बारणे यांनी लक्ष्मण जगतापांवर केलेले सर्व आरोपही आता मागे घेतले आहेत. त्यामुळे मावळमध्ये भाजप आणि शिवसेना एकदिलाने लोकसभा लढण्यास सज्ज झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांच्यात दिलजमाई घडवून आणली. याआधीही शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही बारणे-जगताप वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता.

श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांच्यातील वाद मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने बारणे आणि जगताप यांच्यातील वाद मिटल्याने आता पार्थ पवार यांच्यासमोरील अडचणीही वाढणार आहेत.

पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाकडे यंदा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. कारण इथे महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी लढत होणार आहे. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या रिंगणात आहेत, तर शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे पार्थ पवार यांना टक्कर देणार आहेत. अजित पवार यांनी मुलासाठी मावळ लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात म्हणजे 29 एप्रिलला मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. मावळचा नवा शिलेदार कोण असेल, हे 23 मे रोजी कळेलच.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *