33 कोटी वृक्ष लागवडीत घोटाळ्याचा आरोप, मुनगंटीवारांचं ठाकरे सरकारला खुलं आव्हान

| Updated on: Feb 19, 2020 | 4:03 PM

मुनगंटीवार यांनी स्वतः या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी न्यायाधीशांच्या नेतृत्वात समिती नेमण्याची मागणी केली आहे.

33 कोटी वृक्ष लागवडीत घोटाळ्याचा आरोप, मुनगंटीवारांचं ठाकरे सरकारला खुलं आव्हान
Follow us on

चंद्रपूर : माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून 33 कोटी वृक्ष लागवडीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचीही मागणी झाली. आता स्वतः मुनगंटीवार यांनीच या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली (Sudhir Mungantiwar on Tree plantation scam). मुनगंटीवार यांनी स्वतः या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी न्यायाधीशांच्या नेतृत्वात समिती नेमण्याची मागणी केली आहे. राज्यातील शंकेखोरांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी श्वेतपत्रिकाही काढा, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच याबाबत स्वतः लेखी पत्र देणार असल्याचंही ते म्हणाले.

सुधीर मुनगंटवार म्हणाले, “या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी न्यायाधीशांच्या नेतृत्वात समिती नेमा. राज्यातील शंकेखोरांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी श्वेतपत्रिकाही काढा. 33 कोटी वृक्ष लागवड हे ईश्वरीय पर्यावरण कार्य आहे. याच मिशनमुळे राज्यातील वनेत्तर क्षेत्रात जंगल वाढल्याची केंद्रीय वनसर्वेक्षण विभागाने नोंद केली. ही वृक्ष लागवड वनविभागाने नव्हे, तर 32 विभागांनी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी मिळून केली आहे.”

राज्यात मागील सत्ताकाळात दिग्गज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार वनमंत्री असताना 33 कोटी वृक्ष लागवडीचे मिशन सुरु करण्यात आले होते. राज्यातील सत्ता बदलानंतर आता या 33 कोटी वृक्ष लागवडीच्या एकूण स्थितीबद्दल आढावा घेण्याची मागणी काँग्रेसकडून जोरकसपणे होऊ लागली होती. चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तर वनमंत्री संजय राठोड यांना याबाबत सद्यस्थिती अहवाल तयार करण्यासाठी आढावा घेण्याचे पत्रच दिले होते. त्यानुसार भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांना कोंडीत पकडण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारने अशा पद्धतीचा आढावा अहवाल सादर करण्याची तयारी चालवल्याची चर्चा आहे.

वृक्ष लागवडीमधील घोटाळ्याच्या चौकशीची आणि आढावा अहवालाची चर्चा सुरु झाल्यानंतर माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी केली.

33 कोटी वृक्ष लागवडीचं मिशन ईश्वरीय आणि पर्यावरणाचे कार्य आहे. हे काम एकूण 32 विभागांनी आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी हे लक्ष्य पूर्ण केलं. या कामाचे सर्व पुरावे फोटो, व्हिडिओ, ड्रोन फुटेजच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. नागपुरातील मध्यवर्ती नियंत्रण कक्षात यासंबंधीची संपूर्ण आकडेवारी उपलब्ध असल्याचंही मुनगंटीवार यांनी नमूद केलं.

मुनगंटीवार म्हणाले, “याच मिशनच्या सफलतेमुळे केंद्रीय वन सर्वेक्षण विभागाने राज्याच्या वनेत्तर क्षेत्रात 950 चौरस किलोमीटरची जंगल वाढ झाल्याची नोंद केली. वनविभाग हे काम मनरेगा अथवा रोहयोच्या माध्यमातून पूर्ण करते. त्यासाठी मुंबई महापालिकेसारखे टेंडर काढत नाही. सर्वच आमदार आणि संबंधित मंत्री यांनी ताज्या आढावा अहवालात आपला सहभाग द्यावा.”

Sudhir Mungantiwar on Tree plantation scam