
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी वेषांतर करूनच सरकार पाडलं, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. संजय राऊत यांच्या या टीकेचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी समाचार घेतला आहे. तटकरे यांनी या प्रश्नावर एक उलटा प्रश्न करत संजय राऊत यांची बोलतीच बंद केली आहे. 2019मध्ये तुम्ही भाजपला धोका देऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेत होतात, त्याला काय नाव देणार? असा सवालच सुनील तटकरे यांनी केला आहे. तटकरे यांनी मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.
2019ची निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्र लढले होते. या निवडणुकीत युतीला कौल दिला होता. असं असताना संजय राऊत हे शरद पवार आणि काँग्रेसचे दरवाजे झिजवत होते. त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन केली. कौल युतीला असून तुम्ही छुप्प्या भेटी घेऊन आघाडी स्थापन केली. त्याला काय नाव देणार? असा सवाल सुनील तटकरे यांनी केला. जनतेचा कौल त्यांच्या बाजूने होता. जनतेच्या कौलाला कोणी छेद दिला? हे कपट कोणाचे होते? याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावं, असं आव्हानच सुनील तटकरे यांनी राऊत यांना दिलं.
अजितदादा काल दिवसभर दिल्लीत होते. दिल्लीतील काही पत्रकार त्यांच्याकडे गेले. त्यांच्या विनंतीवरून दादांनी त्यांच्याशी एक तास गप्पा मारल्या. खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा झाल्या. दादांच्या स्वभावाप्रमाणे जे काही बोलायचं होतं ते बोलले. आज सगळा तपशील आपल्या वाहिन्यांवर फिरत आहे. काल अजितदादा पत्रकार मित्रांजवळ बोलले. त्या पत्रकारांकडूनच तुम्ही अधिक माहिती घ्या, असं सुनील तटकरे म्हणाले.
सरकारच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहावा अर्थसंकल्प मांडला. राज्याच्या अर्थकारणाला, समाजकारणाला, ग्रामीण भागाला आणि सर्वांना ताकद देणारा अर्थसंकल्प राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच मांडला गेला. अजित दादांची जनसन्मान यात्रा आम्ही ऑगस्टपासून सुरू करत आहोत. त्याची सुरुवात नाशिकमधून करत आहोत. सर्व घटकांशी अजितदादांचा थेटपणे संवाद होणार आहे. माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा योजना, थकीत बिल माफ होऊन बारा तास वीज शेतकऱ्यांना मोफत मिळणार अशा अनेक योजना राबवल्या जाणार आहे.
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान देणार आहोत. या सर्व गोष्टी या यात्रेतून सांगितल्या जाणार आहेत. दोन महिन्यांनी निवडणुकीला सामोरे जायचं आहे. त्यामुळे हे निर्णय लोकांपर्यंत कसे पोचतील, राजकीय विचारधारा, जनतेच्या दृष्टिकोनातून घेतलेले क्रांतिकारी निर्णय या माध्यमातून सर्वसामान्यपर्यंत कसे पोहोचवता येतील हा या यात्रेमागचा हेतू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
तीन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. आम्ही एक समन्वय समिती नेमत आहोत. राज्यात एकत्रितपणाने नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून जागा वाटपाच्या संदर्भात सुद्धा दोन दिवसात चर्चा होईल. चर्चा पूर्ण झाल्यानंतर त्या संदर्भात तपशील देऊ. जागावाट्याच्या संदर्भात कुठलाही मतभेद नाही. निवडून येण्याची क्षमता, सीटिंग उमेदवार या सर्व गोष्टींची निर्णय आम्ही घेणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.