आमदारकीची शपथ घेताच पंकजा मुंडे मंत्रिपदाबाबत काय म्हणाल्या?; पंकजा यांचं मंत्रिमंडळात कमबॅक होणार?
विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 11 सदस्यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून या सदस्यांनी शपथ घेतली. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर या सदस्यांनी मीडियाशी संवाद साधताना भावनांना वाट मोकळी करून दिली.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासहीत विधान परिषदेच्या 11 सदस्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यानंतर या नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी थेट मंत्रीपदावर भाष्य केलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचं मंत्रिमंडळात पुन्हा कम बॅक होणार आहे का? अशी चर्चा रंगली आहे.
पंकजा मुंडे यांनी आमदारकीची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी मंत्रिमंडळात कॅमबॅक होणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर पंकजा मुंडे यांनी थेट प्रतिक्रिया व्यक्त केली. या राज्यात जे निर्णय होतात. त्यामध्ये ही चर्चा राहत असते. माझ्याही नावाची चर्चा आहे. जे निर्णय होईल ते तुम्हीही पाहाल, मीही पाहील. बघू काय होते ते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
म्हणून त्यांना नमस्कार
दरम्यान, शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी यांनीही शपथ घेतल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. परिषद सदऱ्य म्हणून शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार व्यक्त करते. राज्यातील विषय धडाडीने मार्गी लावायचे आहेत. महिला, युवकांचे अनेक प्रश्न सोडवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. आता सामान्य माणसांची लढाई या विधानभवनात पाहायला मिळेल. महिला, शेतकरी यांच्यासाठी योजना ज्या राबवल्यात त्याला न्याय देणार आहे, असं भावना गवळी म्हणाल्या.
शपथ घेताना भावना गवळी या जय एकनाथ म्हणाल्या. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नाथांचे नाथ… त्यांना नमस्कार… त्याच्यामुळे मी सभागृहात आहे… दिल्लीतून या विधानभवनात आले म्हणून मी जय एकनाथ म्हणाले…, असं भावना गवळी म्हणाल्या. मनोज जरांगे यांचा विषय सोडवायला राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. खुल्या पद्धतीने चर्चा करावी. सर्व एकत्र आल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. इश्यू न करता मार्गे निघू शकतो. एकत्र येऊन काम केलं पाहिजे, असा मंत्र एकनाथ शिंदे यांनी दिलाय, असंही त्या म्हणाल्या.
शेतकऱ्यांना न्याय देणार
शेतीच्या बांधावरून विधानभवनाच्या बंधावर मला उभे केले आहे. मी सर्व शेतकऱ्यांना न्याय देणार आहे, असं आमदार सदाभाऊ खोत यांनी शपथ घेतल्यावर सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला न्याय दिला आहे. शरद पवार यांनी समाजाची माती केली. फडणवीसांनी तर दोनदा मराठा समाजाला न्याय दिला, असं खोत म्हणाले.
राजकारणात सर्व एकमेकांना भेटाणं हे नवे नाही. संजय राऊत यांना नवं वाटत असतं. संजय राऊत हे महाभारतातील संजय प्रमाणे वागतात. त्यांना कोण कुठे भेटले… अंधारात भेटला का.. असे अनेक प्रश्न पडतात. आमचे सरकार उजेडात आले. ते अंधारात कारस्थान करतात. त्यांच्या बोलण्याचा फार परिणाम होत नाही, असा टोला खोत यांनी राऊत यांना लगावला.
शपथ घेतलेले सदस्य
पंकजा गोपीनाथराव मुंडे
सदाशिव रामचंद्र खोत
डॉ. परिणय रमेश फुके
भावना पुंडलीकराव गवळी
कृपाल हिराबाई बालाजी तुमाने
योगेश कुंडलीक टिळेकर
डॉ.प्रज्ञा राजीव सातव
शिवाजीराव यशवंत गर्जे
अमित गणपत गोरखे
मिलिंद केशव नार्वेकर
राजेश उत्तमराव विटेकर
