राजभाऊ, तुम्ही 360 डिग्रीत फिरत आहात, सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?

| Updated on: Nov 28, 2022 | 8:52 AM

छत्रपती शिवरायांचा अवमान करणारे वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांबद्दल तुम्ही ठामपणे वक्तव्य करू शकत नाहीत, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली.

राजभाऊ, तुम्ही 360 डिग्रीत फिरत आहात, सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

प्रदीप कापसे, मुंबईः राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अख्य्या भाषणाचा गोषवारा काढला तर एकाच वाक्यात सांगता येईल. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात…असं होतं…  ते भाजपाविरोधात (BJP) बोलू शकत नाहीत. त्यांनी आजवर केलेली आंदोलनं निरर्थक असल्याने ते 360 डिग्रीत फिरत आहेत. अशी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली. गोरेगाव येथील मनसे गटनेत्यांच्या मेळाव्याला काल राज ठाकरे यांनी संबोधित केलं. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली. एकूणच राज ठाकरे यांची आंदोलन आणि त्यांच्या भूमिकांना अर्थ नाही, असा आरोप करताना सुषमा अंधारेंनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल मला वाईट वाटत नाही. इतर राज्यही संघराज्य पद्धतीतील आहे, त्यांचाही विकास झाला पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. त्यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, असं असेल तर तुमच्या पक्षाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेने ऐवजी संघराज्य नवनिर्माण सेना करा ना…

टोलचं आंदोलन केलं. जो माणूस 25 लाखाची गाडी वापरू शकतो, तो 50रुपयांचा टोल भरूच शकतो. त्यामुळे टोलनाक्यांचं आंदोलन करण्यापेक्षा रस्ते नीट आहेत का, हे आंदोलन बघा, असा कानमंत्र सुषमा अंधारे यांनी दिला.

वडापावची गाडी हटवा, टॅक्सीवाल्यांचं आंदोलन करायचं, यापेक्षा गुज्जू बिल्डरांनी जे अतिक्रमण केलं, यावर राज ठाकरे चकार शब्द बोलत नाहीत. त्यामुळे ते 360डिग्री फिरत आहेत, असंच वाटतंय..

एकनाथ शिंदेंनी जादूची कांडी फिरवलं आणि घरात बसलेले मुख्यमंत्री बाहेर निघाले… अशी टीका राज ठाकरेंनी केली. त्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, या सगळ्यांवर बोलण्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्राचं काय नवनिर्माण करणार आहात, हे पाहिलं पाहिजे. छत्रपती शिवरायांचा अवमान करणारे वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांबद्दल तुम्ही ठामपणे वक्तव्य करू शकत नाहीत, ज्या देवेंद्रजींनी मनसे म्हणजे मतदार नसलेला सेना… अशी टीका केली, त्यांना तुम्ही उत्तर देऊ शकत नाहीत. तुम्ही फक्त भावकीत भांडण करू शकता, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.