ट्विटरवरुनही मदत करणाऱ्या सुषमा स्वराज स्वराज यावेळी मंत्रिपदापासून दूर

ट्विटरवरुनही मदत करणाऱ्या सुषमा स्वराज स्वराज यावेळी मंत्रिपदापासून दूर

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी अनेकांसाठी धक्कादायक गोष्ट म्हणजे मावळत्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यावेळी मोदी सरकारमध्ये नसतील. अडचणीत असलेल्या नागरिकांना एका ट्वीटवर मदत करणाऱ्या सुषमा स्वराज शपथविधीमध्ये पाहुण्यांच्या रांगेत बसल्यामुळे त्या मंत्री होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. कारण, मंत्री होणारे सर्व खासदार व्यासपीठावर वेगळ्या रांगेत बसले आहेत.

परदेशात भारतीयांना आलेली अडचण असो किंवा कुणाची पासपोर्टची समस्या, प्रत्येक गोष्टीसाठी सुषमा स्वराज ट्विटरच्या माध्यमातून मदत करत होत्या. त्यांच्या काळात परराष्ट्र मंत्रालयाला वेगळी ओळख मिळाली. जगभरातील वेगवेगळ्या देशांसोबत संबंध प्रस्थापित करण्यामध्ये सुषमा स्वराज यांचीही अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिला. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएच्या बैठकीवेळीही सुषमा स्वराज परदेश दौऱ्यावर होत्या.

निवडणुकीतून माघार

2014 ला सुषमा स्वराज मध्य प्रदेशातील विदिशामधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे यावेळी निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. पण सुषमा स्वराज यांची प्रत्येक वेळी मदतीला धावून येणाऱ्या मंत्री म्हणून ओळख होती. संयुक्त राष्ट्राच्या सभेत पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणं असो किंवा परदेशात अडचणीत असलेल्या भारतीयांची सुटका करणं असो, सुषमा स्वराज यांच्या कामाचं मोठं कौतुक झालं होतं.

1973 साली सुषमा स्वराज यांनी सुप्रिम कोर्टात वकील म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली. त्या विद्यार्थी चळवळीमध्येही सक्रिय होत्या. हरियाणा सरकारमध्ये त्या कॅबिनेट मंत्रीही राहिल्या. शिवाय दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री होण्याचा मानही सुषमा स्वराज यांनाच जातो. अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळातही त्या मंत्री होत्या. 2009 ला विदिशातून 4 लाखांच्या फरकाने जिंकून आल्यानंतर त्यांची लोकसभेत विरोधी पक्ष नेता म्हणून निवड करण्यात आली. 2014 ला मोदी सरकारमध्ये त्यांना परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI