खेकडे वादाने चर्चेत, मंत्री तानाजी सावंतांची संपत्ती 200 कोटींपेक्षा जास्त

तानाजी सावंत यांचे उत्पनाचे साधन उद्योग,गुंतवणूक, पगार आणि शेती आहे. तर मोटे यांचे उत्पन्न साधन शेती आणि पेट्रोल पंप आहे.

खेकडे वादाने चर्चेत, मंत्री तानाजी सावंतांची संपत्ती 200 कोटींपेक्षा जास्त

उस्मानाबाद :  उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा मतदारसंघातील युतीचे उमेदवार डॉ तानाजीराव सावंत (Tanaji Sawant) हे 205 कोटी रुपयांच्या संपत्तीसह सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल मोटे (Rahul Mote) यांच्याकडे 24 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सावंत यांच्यावर 2 गुन्हे नोंद आहेत तर मोटे यांच्यावर 5 गुन्ह्यांची नोंद असून यात आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. डॉ सावंत हे उच्च शिक्षित इंजिनिअर असून पीएचडीधारक आहेत तर मोटे हे बारावी पास आहेत.

तानाजी सावंत यांचे उत्पनाचे साधन उद्योग,गुंतवणूक, पगार आणि शेती आहे. तर मोटे यांचे उत्पन्न साधन शेती आणि पेट्रोल पंप आहे. विद्यमान आमदार राहुल मोटे यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नीच्या नावाने जास्त संपत्ती असल्याने त्या गृहलक्ष्मी ठरल्या आहेत.

शिवसेनेचे उमेदवार डॉ तानाजीराव सावंत यांची माहिती – 

डॉ तानाजीराव सावंत त्यांच्याकडे १२७ कोटी १५ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे यात पत्नी शुभांगी यांच्या नावाने ३१ लाख रुपये इतकी संपत्ती आहे. सावंत यांचे पुत्र गिरीराज यांच्या नावाने ४ कोटी ३३ लाख तर ऋषीराज यांच्या नावाने ४ कोटी १० लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. डॉ सावंत यांच्या कुटुंबाकडे जवळपास शेती, घर यासारखी ६९ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. अशी जवळपास डॉ सावंत यांच्याकडे २०५ कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे.

डॉ सावंत यांच्याकडे विविध बँकांचे जवळपास २३ कोटी रुपयांचे कर्ज देणे आहे. डॉ सावंत यांच्यावर केवळ २ फौजदारी गुन्हे नोंद असून यात संस्थेने कर्मचारी यांचे डेव्हिडन्ट उशिरा भरल्याच्या प्रकरणाचा समावेश आहे. डॉ सावंत यांचे २०१४-१५ या आर्थिक वर्षात एकूण उत्पन्न ८५ लाख रुपये होते तर २०१८-१९ मध्ये ते २ कोटी ८३ लाख रुपये इतके आहे.

सावंत हे उच्च शिक्षित उमेदवार ठरले असून ते इलेक्ट्रीकल इंजिनिअर असून पीएचडी धारक आहेत. शिक्षण महर्षी आणि उद्योजक असलेल्या डॉ सावंत यांच्या उत्पन्नाचा स्रोत गुंतवणुकीवरील परतावा, मालमत्ता भाडे, पगार आणि शेती उत्पन्न आहे तर पत्नी शुभांगी या गृहिणी आहेत. सावंत यांच्या नावाने १ कोटी रुपयांचे मूल्य असलेल्या ८ गाड्या असून पती व पत्नीसह कुटुंबाकडे एकत्रित १ किलो सोने चांदीचे मौल्यवान वस्तू आहेत. डॉ सावंत हे विधानपरिषद सदस्य असून ते राज्य मंत्रिमंडळात जलसंधारण मंत्री आहेत.

राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल मोटे

राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल महारुद्र मोटे यांच्याकडे ५६ लाख रुपयांची जंगम मालमत्ता असून पत्नी वैशाली यांच्या नावाने ३ कोटी ८० लाख रुपयांचे मालमत्ता आहे. मोटे यांच्याकडे ४ कोटी ४० लाख रुपयांची जंगम संपत्ती आहे तर शेती व इतर रूपाने राहुल मोटे यांच्याकडे ३ कोटी रुपयांची व वैशाली यांच्या नावाने १७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

मोटे यांच्याकडे १ लाख २० हजाराचे देणे आहे तर वैशाली यांच्या नावाने असलेल्या पेट्रोलपंप व इतर रूपाने १ कोटी ७० लाख रुपयांचे देणे आहे. राहुल मोटे यांचे उत्पन्न २०१४-१५ वर्षात ते ७ लाख होते तर २०१८-१९ वर्षी २४ लाख ३५ हजार इतके आहे तर पत्नी वैशाली यांचे उत्पन्न २०१४ साली ४१ लाख तर २०१९ मध्ये १ कोटी ४ लाख आहे. मोटे परिवाराचे उत्पन्न स्रोत हे शेती व पेट्रोल पंप व्यवसाय आहे.

एकंदरीत राहुल मोटे हे सर्व आर्थिक व्यवहार त्यांच्या पत्नीच्या नावाने करीत असल्याने  संपत्तीच्या तुलनेत राहुल मोटे यांच्यापेक्षा त्यांची पत्नी वैशाली यांच्या नावाने जास्त संपत्ती असून त्या गृहलक्ष्मी ठरल्या आहेत. राहुल मोटे यांच्याकडे वयक्तिक सोने नसून पत्नीकडे जवळपास अर्धा किलो सोने आहे. मोटे यांच्याकडे एका दुचाकीसह २ चारचाकी गाड्या असून त्यांची किंमत ५५ लाख आहे.  राहुल मोटे यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी वैशाली यांचे उत्पन्न जास्त असून २०१८ साली राहुल मोटे यांचे उत्पन्न २४ लाख तर वैशाली यांचे उत्पन्न १ कोटी इतके आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *