Rajasthan : निवडणूक कॉंग्रेस अध्यक्षपदाची, राजस्थानात मात्र चर्चा मुख्यमंत्र्याची, कोणाची लागणार वर्णी..?

राजस्थानच्या जनतेची सेवा व्हावी हीच माझी इच्छा आहे. मात्र, तुम्ही काळजी करु नका, भविष्यात काय होईल कुठे जाईल ही तर वेळच ठरवणार आहे. असे म्हणत गेहलोत यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.

Rajasthan : निवडणूक कॉंग्रेस अध्यक्षपदाची, राजस्थानात मात्र चर्चा मुख्यमंत्र्याची, कोणाची लागणार वर्णी..?
अशोक गेहलोत आणि सचिन पायलट
| Updated on: Sep 25, 2022 | 7:30 PM

मुंबई : पुढील महिन्यात कॉंग्रेस अध्यक्ष (Congress President) पदासाठी निवडणूक होत आहे. मात्र, यापूर्वी चर्चा सुरु झाली आहे ती, राजस्थानच्या मुख्यमंत्री (Rajasthan CM) पदी कुणाची वर्णी लागणार याची. याबाबत सस्पेन्स कायम असतानाच गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या उपस्थितीमध्ये शांती धारीवाल यांच्या घरी 42 आमदारांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, राजकीय दृष्ट्या ही बैठक महत्वाची मानली जात आहे. शिवाय आज संध्याकाळीच मुख्यमंत्री नावाची घोषणा होऊ शकते.

विधीमंडळ पक्षापूर्वीच अशोक गेहलोत यांनी काही आमदारांना घेऊन बैठक घेतली. त्यामुळे गेहलोत यांच्या मनात नेमकं काय आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे या बैठकीला केवळ गेहलोत यांचे निकवर्तीयच असल्याचे सांगितले जात आहे.

अशोक गेहलोत यांच्या भूमिकेमुळे ते वरिष्ठांचा शब्द पाळतात की त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. गेहलोत यांनी आपल्या निकटवर्तीयाची मुख्यमंत्री पदासाठी वर्णी लागावी यासाठी दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचे बोलले जात आहे.

राजस्थानच्या जनतेची सेवा व्हावी हीच माझी इच्छा आहे. मात्र, तुम्ही काळजी करु नका, भविष्यात काय होईल कुठे जाईल ही तर वेळच ठरवणार आहे. असे म्हणत गेहलोत यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. गेहलोत यांच्या भूमिकेवरुन ते वरिष्ठांवर दबाव निर्माण करीत असल्याची चर्चा आहे.

आगामी मुख्यमंत्र्याची निवड ही आमदारांच्या मतावरच अवलंबून आहे. शिवाय आमदारांनी वेगळी भूमिका घेतली तर सरकार हे पडूही शकते. हे सर्व घडत असतानाच आज संध्याकाळी कॉंग्रेस पक्षाने विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे.

कॉंग्रेसने बोलावलेल्या बैठकीला मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांची निरीक्षक आणि प्रभारी म्हणून निवड केली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार याच्या नावाची घोषणा होणार का हे देखील पहावे लागणार आहे.