भाजपच्या पहिल्या यादीमुळे महाराष्ट्रातील दोन रोमहर्षक लढती निश्चित

भाजपच्या पहिल्या यादीमुळे महाराष्ट्रातील दोन रोमहर्षक लढती निश्चित

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची नावं आहे. या 16 जणांमध्ये 14 विद्यमान खासदार आणि 2 नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. भाजपच्या पहिल्या यादीने महाराष्ट्रातील दोन लक्षवेधक आणि रोमहर्षक लढती निश्चित झाल्या आहेत.

पहिली रोमहर्षक लढत : नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले

भाजपच्या पहिल्या यादीत नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे नागपुरातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच भाजपचे उमेदवार असतील. त्याआधीच काँग्रेसने नागपुरातून माजी खासदार नाना पटोले यांना उमेदवारी दिली आहे.

नाना पटोले यांनी 2014 च्या निवडणुकीवेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मोदी सरकारवर नाराज होत, पुन्हा काँग्रेसवापसी केली. भंडारा-गोंदियाचे खासदार राहिलेल्या नाना पटोले यांना काँग्रेसने यंदा नागपुरातून उमेदवारी दिली असून, पटोले थेट नितीन गडकरी यांना भिडणार आहेत.

नितीन गडकरी हे भाजपचे राज्यासह राष्ट्रीय स्तरावरील मातब्बर नेते आहेत. विद्यमान केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले नितीन गडकरी यांचे नागपूर हे होमग्राऊंड आहे. तिथे ते कधीही पराभूत झालेले नाहीत. शिवाय, नागपुरात रा. स्व. संघाची ताकदही त्यांच्या मागे कायम उभी असते. त्यामुळे त्यांच्याशी लढत ही नाना पटोले यांच्यासाठी आव्हानात्मक असेल, एवढे निश्चित.

दुसरी रोमहर्षक लढत : सुजय विखे विरुद्ध संग्राम जगताप

अहमदनगरमधून अपेक्षेप्रमाणे भाजपने नव्यानेच भाजपवासी झालेल्या सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. सुजय विखे पाटील यांनी काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी खरेतर त्यांचं तिकीट नक्की झालं होतं. मात्र, अधिकृतरित्या आज भाजपने पहिल्या यादीतून सुजय विखेंच्या उमेदवारीची घोषणा केली.

सुजय विखे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांना टक्कर देणार आहेत. त्यामुळे ही लढत अत्यंत रोमहर्षक ठरेल.

सुजय विखे पाटील हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे सुजय विखेंच्या भाजपप्रवेशामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने या जागेवरुन आमदार संग्रमा जगताप यांना उमेदवारी देत मास्टरस्ट्रोक मारला आहे.

संग्राम जगताप यांची नगरमध्ये मोठी ताकद आहे. त्यामुळे सुजय विखे पाटील यांना तोडीसतोड उमेदवार राष्ट्रवादीने संग्राम जगताप यांच्या रुपाने दिला आहे. एकंदरीत नगरमधील सुजय विखे पाटील विरुद्ध संग्राम जगताप ही लढत अत्यंत रोमहर्षक ठरेल, एवढं निश्चित.

भाजपच्या पहिल्या यादीतील महाराष्ट्रातील उमेदवार :

 1. नागपूर – नितीन गडकरी
 2. नंदुरबार – हिना गावित
 3. धुळे – सुभाष भामरे
 4. रावेर – रक्षा खडसे
 5. अकोला – संजय धोत्रे
 6. वर्धा – रामदास तडस
 7. चिमूर-गडचिरोली – अशोक नेते
 8. जालना – रावसाहेब दानवे
 9. भिवंडी – कपिल पाटील
 10. उत्तर मुंबई  – गोपाळ शेट्टी
 11. उत्तर मध्य मुंबई – पूनम महाजन
 12. नगर – सुजय विखे
 13. बीड – डॉ. प्रीतम मुंडे
 14. लातूर – सुधाकरराव श्रंगारे
 15. सांगली – संजयकाका पाटील
 16. चंद्रपूर – हंसराज अहीर
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *