Udayanraje Bhosle : ‘दम असेल तर ईडी चौकशीला सामोरे जा’, उदयनराजेंचं अजित पवारांना आव्हान; खंडणीखोर म्हणत अजितदादांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर

| Updated on: Jun 17, 2022 | 5:26 PM

तुमच्यात दम असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जायला तयार राहा' असं आव्हानच उदयनराजे यांनी अजित पवारांना दिलंय. माण तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी उदयनराजेंवर टीका केली होती.

Udayanraje Bhosle : दम असेल तर ईडी चौकशीला सामोरे जा, उदयनराजेंचं अजित पवारांना आव्हान; खंडणीखोर म्हणत अजितदादांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर
उदयनराजे भोसले, अजित पवार
Image Credit source: TV9
Follow us on

सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सातारा एमआयडीसीत उद्योक का येत नाहीत? असा सवाल करत भाजप खासदार उदनयराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांच्यावर टीका केली होती. अजितदादांच्या या टीकेला आता उदयनराजे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘मी कुठल्या पक्षाच्या विरोधात बोलत नसून भ्रष्टाचाराच्या विरोधात उघडपणे बोलतो. जे कोण मला खंडणीखोर बोलतात त्यांनी समोरासमोर यावं. माझ्यात दम आहे, मी ईडीची चौकशी (ED Inquiry) करायला तयार आहे. तुमच्यात दम असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जायला तयार राहा’ असं आव्हानच उदयनराजे यांनी अजित पवारांना दिलंय. माण तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी उदयनराजेंवर टीका केली होती. त्या टीकेला आता उदयनराजे यांनी उत्तर दिलं आहे.

‘तुमच्यात दम असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरं जा’

अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, ‘तुम्ही त्या काळी साताऱ्याचे लोकप्रतिनिधी होता, मंत्री होता. त्यावेळी तुमची जबाबदारी का नाही पार पाडली ? ज्या कंपन्या साताऱ्यातून गेल्या त्यांना जाऊन विचारा मला कशाला विचारता. या कंपन्या साताऱ्यातून जाण्यास कारणीभूत कोण आहे ? असं असताना खंडणी मागतो असा माझ्यावर आरोप केला जात आहे. मी पक्षाला घरचा आहेर दिला असे बोलले जाते. मी कुठल्या पक्षाच्या विरोधात बोलत नाही तर भ्रष्टाचाराच्या विरोधात उघडपणे बोलतो. जे कोण मला खंडणीखोर बोलतात त्यांनी समोरासमोर यावं. माझ्यात दम आहे, मी ईडीची चौकशी करायला तयार आहे. तुमच्यात दम असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरं जायला तयार राहा. तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत की लोकलुटारे आहात ते ठरवा’, अशा शब्दात उदयनराजे यांनी अजित पवारांचं नाव न घेता त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

अजितदादांची उदयनराजेंवर काय टीका?

लोकप्रतिनिधी चांगले असतील तर कामे चांगली होतात, मात्र, लोकप्रतिनिधीच ठेकेदाराला पाठिशी घालत असेल तर काम नीट होत नाहीत. सातारा एमआयडीसीचे उदाहरण समोर आहे. सातारा एमआयडीसीसाठी सगळ्या बाबी पोषक असताना सुद्धा उद्योजक एमआयडीसीमध्ये येत नाहीत, साताऱ्यात उद्योग का येत नाहीत? असा सवाल करत अजित पवार यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली होती.