
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. यानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या भेटीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या भेटीवर पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, ‘भेटीमुळे आनंद द्विगुणीत झाला. नुसता द्विगुणीत नाही. कित्येक पटीने गुणीत झाला आहे. त्यामुळे नक्कीच पुढचा सर्व काळ चांगला होईल. आम्ही अनेक वर्षाने भेटलो. ज्या घरात वाढलो तिथे भेटलो. ज्यांनी आम्हाला वाढवलं त्यांच्या खोलीत गेलो. आज बऱ्याच वर्षाने राजने घरी येऊन शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषेत द्विगुणीत शब्द आहे. पण त्या पेक्षा कित्येक पटीने हा आनंद मोठा आहे असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
आज राज ठाकरेनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या होत्या. यात राज यांनी ‘माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या असं म्हटलं होतं.
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या
कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या… pic.twitter.com/sFp2Hduubx— Raj Thackeray (@RajThackeray) July 27, 2025
संजय राऊत काय म्हणाले?
राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मातोश्रीत गेल्यानंतर आत बरंच काही घडलं. दोन भाऊ भेटले. एकमेकांना प्रेमाचं आलिंगन दिलं. गप्पा झाल्या. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत व्यंगचित्रांवर चर्चा झाली. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. बऱ्याच चर्चा झाल्या, दोन भाऊ भेटले, दोन नेते भेटले नाहीत. दोन भाऊ आहेत. भेटणं गरजेचं आहे. भेटले. आले. नातं दृढ होत आहे. होतंच. आम्हाला त्याचा आनंद आहे, असे संजय राऊतांनी म्हटले.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
संजय राऊत यांना मनसे ठाकरे गटाच्या राजकीय युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सूचक प्रतिक्रिया देताना राऊत यांनी , “जे होईल ते चांगलंच होईल” असे म्हटले आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या भेटीचे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.