तपास यंत्रणा सुपारी घेऊन काम करताहेत, त्यांची कार्यालये बंद का करू नये?; उद्धव ठाकरे यांचा खरमरीत सवाल

| Updated on: Nov 10, 2022 | 2:15 PM

न्यायदेवतेवर भाष्य करणं गुन्हा आहे. मात्र केंद्रीय कायदा मंत्री त्यावर भाष्य करत आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार की नाही? या घटनेची याची दखल न्याय देवता घेईलच, असंही ते म्हणाले.

तपास यंत्रणा सुपारी घेऊन काम करताहेत, त्यांची कार्यालये बंद का करू नये?; उद्धव ठाकरे यांचा खरमरीत सवाल
तपास यंत्रणा सुपारी घेऊन काम करताहेत, त्यांची कार्यालये बंद का करू नये?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: खासदार संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार टीका केली आहे. लोकांचा तपास यंत्रणांवरील विश्वास उडाला आहे. ईडी अशा पद्धतीने काम करत असेल तर ईडी कार्यालय बंद झालं पाहिजे का? असं लोकांनी विचारलं तर, असं सांगतानाच केंद्रीय तपास यंत्रणा या लुटमारीचं काम करत आहेत. या यंत्रणा सुपारी घेऊन काम करत असतील तर या यंत्रणांची कार्यालये बंद का करू नये? असं देशातील जनतेने विचारलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ईडीसह तपास यंत्रणांवर हल्लाबोल केला. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून अनेक पक्ष फोडले गेले, अनेक पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. बेकायदेशीर अटक केली जात आहे. खोटे गुन्हे दाखल केले जात आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

यावेळी उद्धव ठाकरे यांनी कोर्टाचे आभार मानले. कोर्टाने ईडीच्या प्रकरणात काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्याचंही त्यांनी आभार मानले. यावेळी त्यांनी तपास यंत्रणांचे वाभाडे काढतानाच या यंत्रणांना पाळीव प्राण्यांची उपमा दिली.

केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्यांप्रमाणे वागत आहे. एखाद्याच्या अंगावर जा म्हटलं तर जात आहे. हे संपूर्ण जग बघत आहे. देश बघत आहे. गेल्या काही दिवसातील उदाहरणे आहेत, अशी टीका त्यांनी केली.

कालचा दणका न्यायालयाने केंद्राला दिल्यावरही कदाचित कुठल्या तरी खोट्या केसेसमध्ये परत संजयला गोवण्याचा प्रयत्न होऊ शकेल. एवढ्या चपराकीनंतर लाज वाटण्यासारखं हे केंद्र सरकार असतं तर अशा घटना घडल्या नसत्या, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

न्याय देवताही आपल्या अंकित करण्याचा प्रयत्न सुरू आहे की काय अशी केंद्रीय कायदा मंत्री रिजीजू यांची येत आहेत. सर्व सामान्यांच्या आशेचा किरण न्यायालय असतात. न्यायालय आपल्या बुडाखाली घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला विरोध केला पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.

न्यायदेवतेवर भाष्य करणं गुन्हा आहे. मात्र केंद्रीय कायदा मंत्री त्यावर भाष्य करत आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार की नाही? या घटनेची याची दखल न्याय देवता घेईलच, असंही ते म्हणाले.