मातोश्री 2 तयार, उद्धव ठाकरेंचा पत्ता लवकरच बदलणार!

मातोश्री 2 तयार, उद्धव ठाकरेंचा पत्ता लवकरच बदलणार!

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पत्ता लवकरच बदलण्याची शक्यता आहे. ठाकरे कुटुंबीय सध्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी राहतात. वांद्रे कलानगर येथील या निवासस्थानासमोरच आठ मजली ‘मातोश्री 2’ इमारत तयार झाली आहे. नव्या वर्षात ठाकरे कुटुंबीय या नव्या इमारतीमध्ये शिफ्ट होणार असल्याचं बोललं जात आहे.

ठाकरे कुटुंबीय सध्या ‘मातोश्री’ या 10 हजार स्क्वेअर फूट जागेवरील निवासस्थानी राहतात. नव्या इमारतीची जागा 2016 मध्ये 11 कोटी 60 लाख रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली होती. सुरुवातीला या इमारतीला सहा मजल्यांचीच परवानगी होती, पण नंतर आणखी दोन मजल्यांची परवानगी देण्यात आली.

झी न्यूजच्या वृत्तानुसार, आठ मजल्यांच्या ‘मातोश्री’ 2 इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावर तीन ड्युप्लेक्स फ्लॅट आणि पाच बेडरुम आहेत. स्टडी रुम, स्विमिंग पूल, हॉल अशा अनेक सुविधा यामध्ये असतील. प्रत्येक मजल्यावर ठाकरे कुटुंबातील एक व्यक्ती राहणार असल्याचं बोललं जातं.

मुंबईतील राजकीय भेट असो, किंवा बैठका, ‘मातोश्री’चा एक वेगळा इतिहास आहे. 80 च्या दशकात दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कुटुंबासह वांद्रे पूर्व येथील कलानगरच्या  ‘मातोश्री’ बंगल्यात राहण्यासाठी आले. 1995 साली या बंगल्याचा विस्तार करण्यात आला. पण आता जागा कमी पडू लागल्यामुळे  ‘मातोश्री’ 2 इमारत तयार करण्यात आली आहे.

Published On - 9:16 pm, Fri, 21 December 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI