मी, महाजन आणि ‘ते’ त्रिशूळासारखे, त्रिशूळ चाललं की काम होणारच : मुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा गड मानला जाणाऱ्या बारामती, इंदापूर आणि दौंडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Trishul) यांनी काल प्रचार सभा घेतल्या.

मी, महाजन आणि 'ते' त्रिशूळासारखे, त्रिशूळ चाललं की काम होणारच : मुख्यमंत्री

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा गड मानला जाणाऱ्या बारामती, इंदापूर आणि दौंडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Trishul) यांनी काल प्रचार सभा घेतल्या. या सभांमधून मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis Trishul) राष्ट्रवादीवर निशाणा साधला. राष्ट्रवादीच्या गळतीपासून ते राहुल कुल यांना मंत्रिपद देण्यापर्यंतच्या घोषणा केल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन पाटील, गिरीश महाजन आणि आपण त्रिशूळासारखे असल्याचं म्हटलं. एकूणच त्यांनी या सर्व सभांमधून पवारांना टार्गेट करत जोरदार टोलेबाजी केली.

दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यासाठी चौफुला येथे, तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी इंदापूरमध्ये आणि बारामतीतील भाजपा उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी मालेगाव बुद्रुक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा पार पडल्या. या सभांमधून मुख्यमंत्र्यानी जोरदार टोलेबाजी करत राष्ट्रवादीला लक्ष्य केलं.

पवार साहेब म्हणाले कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत, मात्र त्यांनी जे पैलवान तयार केले ते पळून गेले. म्हणून त्यांना मैदानात उतरावं लागत आहे अशी टीका करत पवारांच्या टीकेला फडणवीस यांनी उत्तर दिलं.  

आम्ही त्रिशूळ

ज्याप्रमाणे भोले शंकराचा त्रिशूल चालला की काम झाल्याशिवाय राहत नाही, त्याप्रमाणेच आमच्या तिघांचा म्हणजेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिघे त्रिशूळ असून, त्याप्रमाणे इंदापूर तालुक्यातील सर्व प्रश्न मार्गी लागल्याशिवाय सोडणार नाही, असं जाहीर आश्वासन मुख्यमंत्र्यांनी इंदापूर येथे दिले आहे.

त्याचवेळी त्यांनी आता यापुढे हर्षवर्धन पाटील यांना सर्वतोपरी ताकद देण्याचं आश्वासनही दिलं.

राहुल कुल यांना मंत्रिपदाचं आश्वासन

महायुतीचे उमेदवार आमदार राहुल कुल यांना 2014 पेक्षा दुप्पट मताधिक्याने विधानसभेत पाठवा, मी त्यांना मंत्री करतो. कुल यांच्या पाठिशी सरकार भक्कमपणे उभे असल्याने विकासाची काळजी तुम्ही करू नका. स्थानिक प्रश्न एक वर्षात मार्गी लावतो अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

एकूणच मुख्यमंत्र्यानी पवारांच्या गड असलेल्या बारामती, इंदापूर आणि दौंड येथे सलग तीन सभा घेत संबंधित उमेदवारांना ताकद देण्याचे संकेत दिलेत. त्याचवेळी त्यांनी तिन्ही सभांमधून पवारांवर हल्लाबोल केलाय. त्यामुळं निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री विरुद्ध राष्ट्रवादी कलगीतुरा रंगताना दिसत आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI