पश्चिम बंगालमध्येही भाजपची ‘मेगाभरती’!, ममतांचे अनेक दिग्गज भाजपात दाखल

| Updated on: Dec 18, 2020 | 10:55 AM

भाजपने महाराष्ट्राप्रमाणे पश्चिम बंगालमध्येही मेगाभरती सुरु केली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांना धक्का देण्यात भाजप यशस्वी ठरतो की महाराष्ट्राप्रमाणे तिथे काही वेगळंच चित्र दिसेल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पश्चिम बंगालमध्येही भाजपची मेगाभरती!, ममतांचे अनेक दिग्गज भाजपात दाखल
Follow us on

नवी दिल्ली: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना सत्तेचा सोपान गाठून देणारे अनेक नेते आज भाजपचं कमळ हाती घेताना दिसत आहेत. ममता यांच्या सर्वात जवळचे मानले जाणारे शुभेंदु अधिकारी यांनीही तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकत पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. TMC ला रामराम ठोकल्यानंतर शुभेंदु अधिकारी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. (Many Trinamool Congress leaders join BJP)

यापूर्वी मुकूल रॉय, शोभन चॅटर्जी, अर्जुन सिंह, सौमित्र खान, अनुपम हाजरा, शंकु देब पांडा, मिहिर गोस्वामी, सब्यसाची दत्ता आणि शीलभद्र दत्त यांसारख्या मोठ्या नेत्यांनी तृणमूल काँग्रेस आणि पर्यायानं ममता बॅनर्जी यांच्यापासून फारकत घेतली आहे. या नेत्यांची थोडक्यात माहिती
घ्यायची झाली, तर

शुभेंदु अधिकारी

ममता बॅनर्जी यांना सत्तेत आणण्यासाठी सर्वात महत्वाच्या ठरलेल्या नंदीग्राम आंदोलनाचे प्रणेते म्हणून शुभेंदु अधिकारी यांची ओळख आहे. मात्र, अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसपासून घेतलेली फारकत ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. अधिकारी हे पूर्ण मिदनापुरातील एका मोठ्या राजकीय परिवारातून येतात. शुभेंदु यांचे वडील शिषिर अधिकारी आणि छोटे भाऊ दिव्येंद्यु अधिकारी दोघेही टीएमसीचे खासदार आहेत. त्यांनी आपला प्रभाव असलेल्या परिसरातून जवळपास 36 जागांवर तृणमूलचे उमेदवार निवडून आणले होते.

मुकुल रॉय

ममता बॅनर्जी यांचे राजकीय चाणक्य म्हणून ओळख असलेल्या मुकुल रॉय यांनी भाजपमध्ये प्रवेश करत 2019च्या लोकसभा निवडणुकीत आपला प्रभाव दाखवून दिला आहे. रॉय हे तृणमूलच्या स्थापनेतील महत्वाचे नेते होते. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या टीममध्ये मुकुल रॉय हे सध्या उपाध्यक्ष आहेत.

शोभन चॅटर्जी

कधीकाळी ममता यांचा उजवा हात मानले जाणारे शोभन चॅटर्जी यांनी 2019 मध्ये तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. ममता यांनी पक्षाच्या बैठकीत शोभन यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्याला शोभन चॅटर्जी आणि बैशाखी बंद्योपाध्याय यांच्यातील संबंधांचा धागा होता. त्यानंतर शोभन यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

अर्जुन सिंह

तृणमूल काँग्रेसमध्ये अर्जुन सिंह यांचाही मोठा बोलबाला होता. पुढे ममता बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 2019 मध्ये भाजपच्या तिकीटावर ते खासदारही झाले. त्यांना भाजपात आणण्यासाठी मुकुल रॉय यांची मोठी भूमिका होती.

वरील दिग्गजांसह सौमित्र खान, अनुपम हाजरा, शंकु देब पांडा, मिहिर गोस्वामी, सब्यसाची दत्ता आणि शीलभद्र दत्त यांनीही ममता बॅनर्जी यांच्यापासून फारकत घेत भाजमध्ये प्रवेश केलाय. नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपनं दमदार विजय मिळवत सत्ता राखली आहे. तर हैदराबाद महापालिका आणि केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपने चांगली कामगिरी केली आहे. त्यानंतर भाजपने आपला मोर्चा आता पश्चिम बंगालकडे वळवला आहे. त्यामुळे ममता यांच्या तृणमूल काँग्रेसला सुरुंग लावण्याची प्रक्रिया भाजपनं सुरुच ठेवली आहे.

जे महाराष्ट्रात तेच बंगालमध्ये?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं मेगाभरती केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नाराज आणि दिग्गजांना भाजपने आपल्या गोटात ओढलं होतं. भाजपमधील या मेगाभरतीमुळं महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दाणादाण उडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, किंबहूना तसं चित्र निर्माणही झालं होतं. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आणि भाजपचा विजयाचा वारू अडखळला. शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करत 105 आमदार असलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं.

भाजपने महाराष्ट्राप्रमाणे पश्चिम बंगालमध्येही मेगाभरती सुरु केली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांना धक्का देण्यात भाजप यशस्वी ठरतो की महाराष्ट्राप्रमाणे तिथे काही वेगळंच चित्र दिसेल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या:

काँग्रेस कात टाकणार? सोनिया ‘त्या’ नेत्यांना भेटणार!

ममता बॅनर्जींना मोठा झटका, अमित शाहांच्या बंगाल दौऱ्याआधी टीएमसीच्या 3 मोठ्या नेत्यांचा राजीनामा

Many TMC leaders join BJP