नरेंद्र पाटलांच्या मिशा आणि उदयनराजेंच्या कॉलरची चर्चा, साताऱ्यात हवा कुणाची?

नरेंद्र पाटलांच्या मिशा आणि उदयनराजेंच्या कॉलरची चर्चा, साताऱ्यात हवा कुणाची?

SATARA Loksabha : सातारा हा हायव्होल्टेज मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले या मतदारसंघाचे खासदार आहेत. तर आता त्यांना आव्हान दिलंय ते शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी. त्यामुळे राष्ट्रवादीचा हुकमी एक्का असलेले उदयनराजेंना ही निवडणूक सोपी नाही, असा जाणकारांचा अंदाज आहे. पण उदयनराजेंचाही जोरदार प्रचार सुरु आहे. त्यामुळे तेही विजयाचा विश्वास व्यक्त करत आहेत.

विधानसभा मतदारसंघांमधलं समीकरण

सातारा मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीच्या उदयानंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला. 2009 आणि 2014 या दोन्ही निवडणुकीत उदयनराजे भोसले मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. या विजयामध्ये राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्याही आमदारांचा मोठा वाटा मानला जातो. सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा येतात. यात कोरेगाव, वाई, सातारा, कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण या सहा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे 4 तर काँग्रेसचा एक आमदार आहे.

पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे शंभुराज देसाई हे आमदार आहेत. उदयनराजे आणि नरेंद्र पाटील यांच्यासोबतच वंचित बहुजन आघाडीकडून सहदेव ऐवळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. उदयनराजेंच्या दोन टर्ममध्ये झालेल्या विकासकामांबाबत आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणामुळे यावेळची लोकसभा निवडणूक उदयनराजेंसाठी प्रतिष्ठेची समजली जाते. महाआघाडी आणि महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना येथे जिंकण्याची समान संधी असून अधिकचे मतदान जो उमेदवार मतदान केंद्रापर्यंत नेईल तो विजयी होईल, असं विश्लेषक सांगतात.

उदयनराजेंना शिवसेना-भाजपातील मित्रांची मदत मिळणार?

उदयनराजेंना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 5 लाख 23 हजारापर्यंत मताधिक्य मिळालं. मात्र यावेळी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना जिल्ह्यातून भाजपाचे आणि शिवसेनेचे पाठबळ मिळालंय, शिवाय जिल्ह्यातील माथाडी वर्गाचा पाठिंबा आहे. यामुळे दोन्ही उमेदवार जिल्ह्यात जोमाने प्रचार करताना दिसत आहेत. मात्र अजूनही ग्रामीण पातळीवर नरेंद्र पाटील यांचं केडर कमी दिसतंय. शिवसेना आणि भाजपातील अनेक पदाधिकाऱ्यांशी उदयनराजेंचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी नरेंद्र पाटील यांना किती मदत करतील याबाबत शंका व्यक्त केली जाते. या बरोबरीने उदयनराजेंच्या 10 वर्षातल्या कामावर जिल्ह्यात नाराजी दिसते. राष्ट्रवादीतील अजूनही काही मंडळी नाराज असल्याचं बोललं जातं. त्यामुळे यावेळी निवडणूक दोन्ही उमेदवारांसाठी महत्वाची समजली जाते. नरेंद्र पाटलांचं आव्हान हे जरी कडवं असलं तरी मात्र छत्रपती उदयनराजे भोसले हे थेट छत्रपतींचे 13 वे वंशज असल्यामुळे मतदारांमध्ये राजेंचा मोठा चाहता वर्ग आहे.

दोन्ही उमेदवारांना विजयाचा विश्वास

सातारा लोकसभा मतदारसंघात दोन्ही उमेदवारांच्या मिशी आणि कॉलरच्या स्टाईलची चर्चा असते. उदयनराजेंनी ग्रेड सडप्रेटर आणि कास धरण उंची वाढविण्याच्या, तसेच रस्त्यांच्या केलेल्या विकासावरकामांचा सहभाग त्यांच्या प्रचारात केलाय. त्यामुळे मीच येणार असल्याची खात्री उदयनराजेंना आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील सुद्धा मिशांना पिळ देत उदयनराजेंनी न केलेल्या कामांचा पाढाच प्रचारात ते वाचून दाखवत आहेत. सातारा जिल्ह्यात पर्यटन विकास झाला नसून बेरोजगारी, तसेच टोलच्या धाडी संदर्भात सुद्धा त्यांनी आवाज उठवलाय. त्यामुळे मीच निवडून येणार असल्याचं पाटील सांगत आहेत.

साताऱ्यात हवा कुणाची हे स्पष्ट दिसत नसलं तरी दोन्ही उमेदवारांना विजयासाठी मेहनत करावी लागणार हे नक्की आहे. कारण, उदयनराजेंचा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. तर नरेंद्र पाटील यांनी अगोदर भाजप आणि नंतर उमेदवारीसाठी शिवसेनेत प्रवेश केला होता. नरेंद्र पाटील हे साताऱ्याला यात्रेसाठी येत असतात, त्यांनी यात्रेकरुसारखं यावं आणि दर्शन घेऊन जावं, असा टोला उदयनराजेंनी लगावला होता. त्यामुळे साताऱ्याची जनता कुणाला पसंती देते ते पाहणं महत्त्वाचं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI