Devendra Fadnavis: सत्ता हात जोडून उभी असताना फडणवीसांनी ती नाकारली, का? 5 कारणे

| Updated on: Jun 30, 2022 | 6:00 PM

Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांना घेऊन बंड केलं. त्यामुळे शिंदे यांच्या या बंडामागे भाजप असल्याची चर्चा होती. पण आम्ही या बंडामागे नाहीत असं सांगण्याचा प्रयत्न भाजपने केला.

Devendra Fadnavis: सत्ता हात जोडून उभी असताना फडणवीसांनी ती नाकारली, का? 5 कारणे
सत्ता हात जोडून उभी असताना फडणवीसांनी ती नाकारली, का? 5 कारणे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्याने राज्यात भाजपचं सरकार येईल अशी शक्यता वर्तवली जात होती. देवेंद्र फडणवीस हेच तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असंही सांगितलं जात होतं. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मास्टर स्ट्रोक लगावला आहे. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. शिंदे यांना भाजप पाठिंबा देईल. मी सत्तेत सहभागी नसेल. पण मी सरकारला मार्गदर्शन करेल, असं देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी जाहीर केलं. विशेष म्हणजे सत्ता हात जोडून समोर उभी असताना फडणवीस यांनी कोणताही मोह न ठेवता सत्तेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. फडणवीस यांनी हा निर्णय का घेतला? यामागे फडणवीस यांची काही खेळी आहे का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

बंडामागे भाजप नसल्याचं ठसवण्याचा प्रयत्न

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांना घेऊन बंड केलं. त्यामुळे शिंदे यांच्या या बंडामागे भाजप असल्याची चर्चा होती. पण आम्ही या बंडामागे नाहीत असं सांगण्याचा प्रयत्न भाजपने केला. पण तरीही या बंडामागे भाजपच असल्याचं उद्धव ठाकरेंपासून ते शरद पवारांपर्यंत सर्वच सांगत होते. भाजपने जर शिंदे यांच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली असती आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले असते तर या बंडामागे भाजपच असल्यावर शिक्कामोर्तब झाले असते. हा आरोप आपल्यावर येऊ नये म्हणूनही फडणवीस यांनी सत्ता नाकारल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

अंतर्गत वादानेच शिवसेना फुटली

ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार अंतर्गत वादाने पडेल असं देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलं होतं. त्यामुळे ठाकरे सरकार हे अंतर्गत वादानेच पडलं. शिवसेना अंतर्गत वादानेच फुटली हे ठसवण्यासाठीच भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्रीपद बहाल केल्याचं सांगितलं जात आहे. इतिहासात कुठेही भाजपमुळे शिवसेना फुटली हे अधोरेखित होऊ नये यासाठीच भाजपने ही काळजी घेतल्याचं सांगितलं जात आहे.

बाळासाहेबांचा शिवसैनिक मुख्यमंत्री केला

बाळासाहेबांचा शिवसैनिक मुख्यमंत्री करणार असल्याचं वचन मी बाळासाहेबांना दिल्याचं उद्धव ठाकरे वारंवार सांगत होते. पण प्रत्यक्षात सत्ता स्थापन करण्याची वेळ आली तेव्हा ते स्वत: मुख्यमंत्री झाले. सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री करण्यासाठी ते अडून बसले नाहीत. त्यामुळे बाळासाहेबांचा शिवसैनिक मुख्यमंत्री आम्हीच केला. जे उद्धव ठाकरेंना जमलं नाही, ते आम्ही करून दाखवलं हे दाखवण्यासाठी फडणवीसांनी ही खेळी खेळल्याचंही सांगितलं जात आहे.

आम्हाला सत्तेचा मोह नाही

ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून भाजप अधिकच आक्रमक झाली होती. प्रत्येक गोष्टीत ठाकरे सरकारची अडचण करण्याचा प्रयत्न भाजपने केला होता. आघाडीतील नेत्यांच्या घरावर ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या धाडी पडल्या. त्यामुळे भाजप सत्तेसाठी हपापल्याचंही बोललं जात होतं. मात्र, शिंदे यांना मुख्यमंत्री करून आम्हाला सत्तेचा मोह नाही हे दाखवून देण्याचं काम भाजपने केल्याचंही सांगितलं जातं.

2024च्या विधानसभेची तयारी

भाजपचे प्लॅन नेहमी शॉर्ट टर्मचे नसतात. ते लाँग टर्मचेच असतात. शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यामागेही तोच हेतू आहे. 2024च्या विधानसभेच्या तयारीसाठी भाजपने हा मोठा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं. 2024च्या निवडणुकीत स्वबळावर सत्तेत येण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. म्हणूनच त्यांनी स्वत: सत्तेत जाण्याऐवजी शिंदे यांना सत्तेची सूत्रे दिल्याचंही सांगितलं जात आहे.