या पाच गोष्टींमुळे प्रकाश आंबेडकर आणि आठवले सोलापूरच्या जागेसाठी ठाम

या पाच गोष्टींमुळे प्रकाश आंबेडकर आणि आठवले सोलापूरच्या जागेसाठी ठाम

सोलापूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील आघाडीचा तिढा अजून सुटलेला नाही. कारण, दोन्ही काँग्रेसमध्ये सध्या नगरच्या जागेवरुन संघर्ष सुरु आहे. तर मित्रपक्षांना सोबत घेण्यासाठीही बोलणी सुरु आहे. भारिपचे प्रकाश आंबेडकर 12 जागांच्या मागणीवर ठाम आहेत. यामध्ये सोलापूरची जागा त्यांना हवीय. दुसरीकडे युतीत स्थान न मिळाल्याने नाराज असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही सोलापूरच्या जागेची मागणी केली आहे. आघाडीमध्ये सोलापूर मतदारसंघ काँग्रेसकडे, तर युतीत ही जागा भाजपच्या ताब्यात आहे.

सोलापूरच्या जागेसाठी आठवले गट आणि भारिपचा हट्ट का?

सोलापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यावेळीही सोलापुरातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. पण भारिपने सोलापूरच्या जागेची मागणी केली आहे. विशेष म्हणजे हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळेच भारिप आणि आठवले गटाचा या जागेसाठी आग्रह असल्याचं बोललं जातंय. शिवसेना आणि भाजपने त्यांच्या कोट्यातून मुंबईसह राज्यातील आणखी एक जागा आरपीआयला सोडावी, अशी मागणी आठवलेंनी केली. मुंबईबाहेरच्या जागेसाठी त्यांनी सोलापूरचा उल्लेख केला.

भारिप आणि आठवले गटाला सोलापूरची जागा का हवी?

सोलापूर हा मतदारसंघ राखीव असल्यामुळे इथे अनुसूचित जाती आणि जमातींच्या मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच भारिप आणि आठवले गटाच्या कार्यकर्त्यांची या जागेसाठी आग्रही मागणी आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मुस्लीम मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

काँग्रेस आणि भाजप दोघांनीही फसवलंय, त्यामुळे दोघेही नको, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे राखीव असलेल्या त्याच श्रेणीतला उमेदवार द्यावा अशी मागणी आहे. भारिपला एमआयएमची साथ असल्याने मुस्लीम मतं मिळतील, असा प्रकाश आंबेडकरांचा अंदाज आहे.

सोलापुरात ओबीसींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने ही मतंही मिळतील, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकरांना असल्याचं बोललं जातं. त्यामुळे प्रकाश आंबेडकर सोलापूरच्या जागेसाठी ठाम असल्याची चर्चा आहे.

सोलापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला तर होताच, पण 2014 ला ही जागा भाजपने जिंकली. पण भाजपच्या खासदारावर प्रचंड नाराजी आहे. शिवाय सुशील कुमार शिंदे यांच्याकडे एवढी महत्त्वाची पदं असूनही त्यांनी जिल्ह्याचा विकास केला नाही असा आरोप आहे. त्यामुळे नवा पर्याय या मतदारसंघात असावा, अशी आठवले गट आणि भारिप कार्यकर्त्यांची मागणी आहे.

सोलापूर लोकसभेला 2014 ला काय झालं?

2014 साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशभरात काँग्रेसचा धुव्वा उडालेला असताना इकडे मोदींच्या त्या सुनामीचा चांगलाच प्रभाव पडला. आपल्या कुंडलीत पराभव नसल्याचं छातीठोकपणे सांगणाऱ्या शिंदेंच्या कुंडलीत मोदी लाटेचा शनी आला आणि त्याच्या प्रभावाने 40 वर्षांच्या राजकीय प्रवासात कधी न पाहिलेल्या पराभवाला शिंदे सामोरे गेले. त्यावेळी देशभरात मोदी नावाचं वादळ घोंगावत असताना सोलापूर लोकसभा मतदारसंघात त्याचा फारसा परिणाम जाणवत नव्हता. इतकंच काय, भाजपच्या उमेदवाराचा सुद्धा पत्ताच नव्हता. ऐनवेळी भाजपने नवख्या असलेल्या शरद बनसोडेंना बोहल्यावर बसविले. त्यामुळे शिंदेंच्या विजयाचा घोडा पुढे जाईल असं चित्र असतानाच निकालानंतर शिंदेंना धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI