अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीला मिळणार का? जय पवारांनी दिली मोठी अपडेट, थेट मुख्यमंत्र्यांचे नाव घेत म्हणाले…

Jay Pawar : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अर्थखात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवलेली आहे. आता हे खातं पुन्हा राष्ट्रवादीला मिळणार का यावर जय पवार यांनी भाष्य केले आहे.

अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीला मिळणार का? जय पवारांनी दिली मोठी अपडेट, थेट मुख्यमंत्र्यांचे नाव घेत म्हणाले...
jay Pawar on Finance Ministry
Image Credit source: Google
| Updated on: Jun 29, 2026 | 2:34 PM

अजित पवार यांच्या निधनाला 5 महिने उलटले आहेत. उपमुख्यमंत्रीपदासह अर्थखात्याचीही जबाबदारी अजितदादांवर होती. मात्र त्यांच्या अपघाती निधनानंतर अर्थखात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवलेली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस यांनी अर्थसंकल्पही सादर केला होता. मात्र त्यानंतर हे खात राष्ट्रवादीकडे देण्यात येण्याची शक्यता होती, मात्र अद्यापही अर्थखात राष्ट्रवादीला मिळालेले नाही. अशातच आता अर्थखात्याबाबत दिवंगत अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी या खात्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बारामतीत कृतज्ञता स्नेहमेळाव्याचे आयोजन

आज बारामतीत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सहवासातील आजी-माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा कृतज्ञता स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांच्या उपस्थितीत कृतज्ञता स्नेहमेळावा पार पडला. बारामती तालुक्यातील आजी-माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे मोठ्या प्रमाणात सदस्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. बारामती पंचायत समिती यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जय पवार यांनी अर्थखात्याबाबत मोठे विधान केले आहे.

दादा आपल्याला सोडून जातील असं वाटलं नव्हतं…

जय पवार यांनी कृतज्ञता स्नेहमेळाव्यात बोलताना म्हटले की, देशातील सर्वात जास्त मतांनी सुनेत्रा पवार निवडून आल्याने सर्वांचे मनापसून आभार व्यक्त करतो. दादा आपल्याला लवकर सोडतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. अर्थ खातं आपल्याकडे नसल्याने विकासकामे रखडली आहेत पण तसे नाहीये. दादा आपल्याला सोडून गेले. दादा गेल्यानंतर अर्थसंकल्प मांडायचा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले अर्थखाते त्यांच्याकडे घेतलेले आहे.

अर्थखातं लवकरच आपल्याकडे येईल – जय पवार

पुढे बोलताना जय पवार यांनी म्हटले की, मुख्यामंत्रांशी चर्चा झाली आहे, लवकरात लवकर अर्थ खाते आपल्याकडे येईल. जशी महाराष्ट्र राज्यातील लोकांना काळजी आहे, त्यापेक्षा आम्हाला काळजी आहे, कारण दादा आमचे वडील आहेत. यावेळी बोलताना जय पवार यांनी दादांचे स्मारक बारामतीत होणार आहे अशी माहितीही दिली आहे. दरम्यान, आता जय पवार यांनी अर्थखातं राष्ट्रवादीकडे येणार असल्याची माहिती दिली आहे, त्यामुळे आता या खात्याची जबाबदारी कुणाकडे येते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us