Astrology 2023 : सूर्य चंद्राच्या युतीमुळे अमावस्या योग, तीन राशींच्या जीवनात होणार उलथापालथ
Amavasya Yog : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहमंडळात घडणाऱ्या घडामोडींचा जीवनावर परिणाम होत असतो. चंद्र आणि सूर्य आता एकत्रितपणे सिंह राशीत येणार आहे. त्यामुळे तीन राशींवर परिणाम दिसून येणार आहे.

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या उलथापालथीमुळे राशीचक्रावर परिणाम होत असतो. त्यामुळे शुभ अशुभ योगाची स्थिती निर्माण होते. एक महिना कर्क राशीत ठाण मांडल्यानंतर सूर्यदेव सिंह राशीत आला आहे. वर्षाभरानंतर या राशीत सूर्यदेव आला आहे. 17 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 1 वाजून 23 मिनिटांनी सूर्याने सिंह राशीत प्रवेश केला आहे. या राशीत या आधीच चंद्र असल्याने अमावस्या योग जुळून आहे. चंद्र आणि सूर्यामध्ये वितुष्ट असल्याचं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं. या योगामुळे चंद्राची स्थिती कमकुवत होते. चंद्र हा मनाचा कारक आणि सूर्य हा आत्म्याचा कारक ग्रह आहे. चंद्र कमकुवत झाल्याने जातकांना मानसिक तणाव आणि आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींवर परिणाम होणार ते…
16 ऑगस्टला चंद्र कर्क राशीतून सिंह राशीत संध्याकाळी 4 वाजून 57 मिनिटांनी आला आहे. सूर्याने 17 ऑगस्टला सिंह राशीत प्रवेश केला. 19 ऑगस्टला चंद्र सिंह राशीतून कन्या राशीत सकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी प्रवेश करेल. त्यानंतर अमावास्या योग संपुष्टात येईल.
तीन राशींवर पडणार प्रभाव
वृश्चिक : सूर्य या राशीच्या दशम स्थानात गोचर करत आहे. यामुळे नोकरी आणि धंद्यात लाभ मिळेल. पण आपल्या स्वभावात अहंकार येणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण आपल्या कठोर वाणीमुळे अनेकांची मनं दुखावली जाऊ शकतात. त्यामुळे अहंकार दूर सारून कामाला लागा आणि प्रामाणिकपणे मदत करा. चंद्राच्या स्थितीमुळे मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागू शकतं.
मकर : सूर्य आणि चंद्राची युती या राशीच्या आठव्या स्थानात होत आहे. सव्वा दोन दिवस सोडले तर सूर्याची साथ मिळेल. पण अमावास्या योगामुळे परिणाम होईल. या राशीच्या जातकांना आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. मनात कसलीतरी भीती लागून राहील. त्यामुळे थोडं सांभाळून राहणं गरजेचं आहे. अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे स्वत:च्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
कुंभ : सूर्य या राशीच्या सातव्या स्थानात असेल. त्यामुळे चंद्र आणि सूर्याच्या युतीमुळे वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. पत्नीसोबत छोट्या छोट्या कारणावरून वाद होऊ शकतात. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा आणि जितकं शक्य होईल तितकं कमी बोला. या काळात काही शक्य झाल्यास व्यवहार करू नका. अन्यथा फटका बसू शकतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
