Horoscope 2023 : सिंह राशीत चार ग्रह आले एकत्र! या राशींवर होणार सकारात्मक परिणाम

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह राशीचक्रात भ्रमण करत असतात. ग्रहांचा भ्रमण कालावधी कमी अधिक असल्याने ग्रहांची युती आघाडी होत असते. त्याचा परिणाम राशीचक्रावर दिसून येतो.

Horoscope 2023 : सिंह राशीत चार ग्रह आले एकत्र! या राशींवर होणार सकारात्मक परिणाम
जोतिषशास्त्र
| Updated on: Aug 17, 2023 | 4:31 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याने वर्षभरानंतर सिंह राशीत प्रवेश केला आहे. ही सूर्याची स्वरास असल्याने सूर्याची स्थिती प्रभावी असणार आहे. दुसरीकडे, या राशीत तीन ग्रह आधीच ठाण मांडून बसले आहेत. मंगळ, बुध आणि चंद्र या ग्रहांसोबत सूर्य आल्याने चतुर्ग्रही योग तयार झाला आहे. चंद्र आणि मंगळ हे दोन ग्रह काही तासानंतर कन्या राशीत प्रवेश करतील. पण काही तासांसाठी का होईना चार ग्रह एकत्र आले आहेत. सूर्य आणि बुधामुळे बुधादित्य योग, सूर्य आणि चंद्रामुळे अमावस्या योग, चंद्र आणि मंगळाच्या युतीमुळे लक्ष्मी योग जुळून येणार आहे. त्यामुळे मेष ते मीन राशींवर परिणाम दिसून येईल. पण काही राशीच्या जातकांना उद्योग धंदा आणि नोकरीत यश मिळू शकते. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींवर सकारात्मक परिणाम होईल ते..

चार राशीच्या जातकांना मिळणार लाभ

वृषभ : या राशीच्या चौथ्या स्थानात चतुर्ग्रही योग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. कुटुंबात काही चांगल्या घडामोडी घडतील. सुख सुविधा आणि आर्थिक कोंडी या काळात फुटेल. आरोग्य चांगलं राहील आणि गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील.

मिथुन : या राशीच्या तिसऱ्या स्थानात चतुर्ग्रही योग तयार होत आहे. त्यामुळे या काळात आत्मविश्वास दुणावलेला राहील. हाती जे काम घ्याल त्यात अपेक्षित यश मिळेल. कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. तसेच नातेवाईकांकडून कौतुकाचे शब्द कानावर पडतील. नोकरी करणाऱ्या जातकांनाही लाभ मिळेल.

तूळ : या राशीच्या एकादश भावात हा योग तयार होत आहे. त्यामुळे समाजात मानसन्मान वाढेल. तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. नेतृत्व गुणांमुळे तुम्ही योग्य निर्णय घ्याल. एखादा नवीन उद्योग व्यवसाय या काळात सुरु करू शकता. यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. अचानकपणे धनलाभ होऊ शकतो.

वृश्चिक : या राशीच्या दशम स्थानात चतुर्ग्रही योग तयार होत आहे. यामुळे प्रगतीची नवी दारं खुली होतील. मुलांकडून अपेक्षित कार्य पार पडेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी बॉसकडून कौतुकाची थाप पडेल. हाती आलेल्या पैशातून योग्य ती बचत करा. मुलांच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून पावलं उचला.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)