Kaal Bhairav Jayanti: जीवनात वारंवार अडचणी येत आहेत? कालभैरव जयंतीच्या दिवशी आवर्जून करा ‘हे’ उपाय
कालभैरव जयंतीचा दिवस भगवान शंकरांचे रौद्र रूप असलेल्या कालभैरवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अशी धार्मिक मान्यता आहे की, या दिवशी काही विशेष उपाय केल्याने जीवनातील विविध अडचणी दूर होण्यास मदत होते.

हिंदू धर्मात महादेवाच्या अनेक रूपांची पूजा केली जाते. त्यापैकी कालभैरव या रूपाला विशेष महत्त्व आहे. कालभैरवांना भगवान शंकरांचे रौद्र रूप मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, कालभैरव आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि त्यांना भय, नकारात्मक शक्ती तसेच जीवनातील विविध अडचणींपासून मुक्ती देतात. त्यामुळे कालभैरव जयंतीचा दिवस त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरव जयंती साजरी केली जाते. याच दिवशी भगवान शंकरांनी कालभैरव रूपात प्रकट झाल्याची धार्मिक मान्यता आहे.
यंदा 1 डिसेंबर 2026, मंगळवारी कालभैरव जयंती साजरी केली जाणार आहे. बाबा कालभैरव यांना काशीचे कोतवाल असेही म्हटले जाते. या दिवशी त्यांची पूजा करण्यासोबतच काही विशेष उपाय करण्याची परंपरा आहे. हे उपाय केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि भगवान कालभैरवांचा आशीर्वाद मिळतो, अशी मान्यता आहे. जाणून घेऊया कालभैरव जयंतीला कोणते विशेष उपाय करावेत.
मोहरीच्या तेलाचा दिवा लावा
कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री भगवान कालभैरवांसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. धार्मिक मान्यतेनुसार, असे केल्याने जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि भीतीपासून मुक्ती मिळते. या दिवशी मनोभावे बाबांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा.
काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घाला
धार्मिक मान्यतेनुसार, काळ्या कुत्र्याला भगवान कालभैरवांचे वाहन मानले जाते. त्यामुळे कालभैरव जयंतीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालणे शुभ मानले जाते. पोळीला थोडे मोहरीचे तेल लावून किंवा गोड पोळी करूनही खाऊ घालू शकता. असे केल्याने कालभैरव प्रसन्न होतात, अशी श्रद्धा आहे.
काळे तीळ आणि उडीद डाळ दान करा
कालभैरव जयंतीच्या दिवशी काळे तीळ, अख्खी उडीद डाळ, मोहरीचे तेल आणि काळ्या कपड्यांचे दान करणे शुभ मानले जाते. आपल्या श्रद्धेनुसार या वस्तू गरजू व्यक्तीला दान करू शकता किंवा मंदिरात अर्पण करू शकता. असे केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात आणि सुख-शांती टिकून राहते, अशी धार्मिक मान्यता आहे.
मंत्र जप करा
या दिवशी भगवान कालभैरवांची पूजा करताना ‘ॐ कालभैरवाय नमः’ या मंत्राचा जप करावा. आपल्या श्रद्धेनुसार या मंत्राचा १०८ वेळा जप करू शकता. धार्मिक मान्यतेनुसार, मंत्रजप केल्याने मनाला शांती मिळते आणि भक्तांवर कालभैरवांची कृपा राहते.
कालभैरव अष्टक किंवा भैरव चालीसाचे पठण करा
कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान कालभैरवांच्या पूजेसोबत कालभैरव अष्टक किंवा भैरव चालीसाचे पठण करणेही शुभ मानले जाते. असे केल्याने भीती आणि जीवनातील अडथळ्यांपासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. या दिवशी बाबांना इमरती, जिलेबी, नारळ, चुरमा किंवा गोड भाकरीचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर प्रसादाचे लोकांमध्ये वाटप करावे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
