
मुंबई : हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व मानले जाते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी (Aashadhi Ekadashi 2023) म्हणतात. या दिवशी पंढरपूरात लाखो भावीक दर्शनासाठी येतात. या एकादशीला देवशयनी एकादशीसुद्धा (Devshayani Ekadashi 2023) म्हणतात या दिवसापासून पुढचे चैर महिने भगवान विष्णू योग निद्रेत जाता. या दिवशी नियमानुसार भगवान विष्णूची पूजा केल्याने अपार आशीर्वाद प्राप्त होतात. धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते. या दिवशी नियमानुसार पूजा व दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते. या दिवसापासून चातुर्मासही सुरू होतो. त्यानंतर कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. धार्मिक शास्त्रानुसार या दिवशी काही कामं करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
एकादशीच्या दिवशी भाविक भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. एकादशीच्या दिवशी काही नियम सांगण्यात आले आहेत. ज्याचे पालन केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात. त्यामुळे एकादशीच्या दिवशी काही गोष्टी करणे टाळावे.
एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि देवाच्या मंत्रांचा जप करावा. भक्तीमध्ये तल्लीन होऊन भगवंतावरची श्रद्धा व्यक्त केली पाहिजे.
देवशयनी एकादशीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा. या दिवशी चुकूनही मांस, दारू, लसूण, कांदा यांचे सेवन करू नये. याशिवाय या दिवशी कोणतीही नशा करू नये. असे केल्यास भगवान विष्णू तुमच्यावर नाराज होऊ शकतात आणि तुमचे काम बिघडू शकते.
धार्मिक शास्त्रानुसार कोणत्याही एकादशीला भाताचे सेवन करू नये. या दिवशी व्रत करून भगवान विष्णूची पूजा करावी. पोहे पुलाव इत्यादी भातापासून बनवलेल्या इतर गोष्टी खाणे टाळा. एकादशीच्या दिवशी भात खाण्यास सक्त मनाई आहे.
देवशयनी एकादशीच्या दिवशी कोणाशीही वाईट वागू नये, कोणाचाही वाईट विचार करू नये, या दिवशी केवळ भक्तीत लीन राहावे. भगवान विष्णूची कथा ऐकावी आणि त्यांच्या मंत्रांचा जप करावा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)