
भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे. यालाच पितृ पंधरवाडा असं देखील म्हणतात, पितृपक्षाची समाप्ती अश्विन अमावस्येला होते. यंदा सात सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे, तर 21 सप्टेंबरला पितृपक्षाची सांगता होणार आहे. पितृपक्षाचा काळात घरात नवे कपडे किंवा कोणतीही नवी वस्तू आणणं अशुभ मानलं जातं. मात्र यामागे नेमकं काय कारण आहे? हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊयात.
पितृपक्षाच्या दिवसांमध्ये आपल्या पूर्वजांच्या नावानं पिंडदान केलं जातं, तर्पण केलं जातं. तर्पण आणि पिंडदान केल्यामुळे पूर्वज प्रसन्न होतात, त्यांना मोक्ष मिळतो, त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो अशी मान्यता आहे.ज्या लोकांना पितृदोष आहे, त्यांनी या काळात पिंडदान आणि तर्पण केल्यास त्यांचा पितृदोष दूर होतो. मात्र या काळात तुम्ही जर घरात एखादी नवी वस्तू किंवा कपडे आणले तर आपले पूर्वज नाराज होतात आणि पितृदोष वाढतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे आपल्याला तर्पणाची फळ प्राप्ती होत नाही.
या काळात नवे कपडे का खरेदी करू नये?
ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षाच्या काळात नवे कपडे खरेदी करू नये, कारण कपडे हे सर्वसामान्यपणे तुमच्या घरात काही शुभकार्य असेल तरच खरेदी केले जातात, जसं की लग्न, एखादी पूजा किंवा उत्सव असेल तर तुम्ही तुमच्या घरात नव्या कपड्यांची खरेदी करतात. मात्र पितृपक्षाचा उद्देशच हा असतो की, तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा. त्यासाठी तर्पण केलं जातं.त्यामुळे या काळात नवे वस्त्र खरेदी करणं अशुभ मानलं जातं, पितृपक्षात नवे कपडे खरेदी केल्यास किंवा एखादी नवी वस्तू खरेदी केल्यास आपले पूर्वज नाराज होतात अशी मान्यता आहे. त्यामुळे पितृदोष वाढतो, आपल्या अडचणीत देखील वाढ होते. घरात शांती राहात नाही, कामात देखील अनेक अडचणी निर्माण होतात, त्यामुळे पितृपक्षात कधीही नवे कपडे खरेदी करू नये, पितृपक्षात पिंडदान केल्यानं पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात, आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळते अशी मान्यता आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)