
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये ज्या नीती सांगितल्या आहेत, त्या केवळ राज्यकारभार कसा करावा? एवढ्यापुरत्याच मर्यादित नाहीत, तर त्या आजच्या काळातही जीवन जगताना माणसाला प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. हा निमय एखाद्या प्रदेशापासून ते व्यक्तीपर्यंत सर्वांनाच लागू होतो. जो व्यक्ती आपलं स्वातंत्र्य गमावून बसतो, त्याच्या इतका जगात दुसरा दुर्दैवी व्यक्ती कोणी असू शकत नाही. मात्र याहीपेक्षा सर्वात खतरनाक गोष्ट असते ती म्हणजे एखाद्या व्यक्तीचा किंवा त्याच्या विचाराचा मानसिक गुलाम होणे होय, जे व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा किंवा त्याच्या विचाराचा मानसिक गुलाम झालेले असतात, अशा सर्व लोकांचं कंट्रोल त्या व्यक्तीकडे असतं, जे लोक मानसिक गुलाम होतात, त्यांच्यावर काही दिवसांनी अशी वेळ येते की हे लोक पुन्हा कधीच स्वत:च्या मनानं विचार करू शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही विचाराचे किंवा व्यक्तीचे मानसिक गुलाम होऊ नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
चाणक्य पुढे म्हणतात की जर तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही दुसऱ्या लोकांचा सल्ला आवश्य घ्या, तुम्हाला जे आदर्श वाटतात त्यांच्याशी चर्चा करा पण शेवटी तुमचं मन तुम्हाला काय सांगतं? ते ऐकूनच निर्णय घ्या, कोणाच्याही दबावामध्ये निर्णय घेऊ नका, तर तुम्ही मानसिक गुलामीपासून दूर रहाल. चाणक्य असाही सल्ला देतात की कोणतीही एक गोष्टीवर जसं की आराम, मनोरंजन किंवा एखादी व्यक्ती असेल तिच्यावर खूप जास्त अवलंबून राहू नका, कारण जर तुम्ही अशा सवयीचे मानसिक गुलाम झाले आणि यातील एखादी गोष्टी तुमच्या आयुष्यातून अचानक गायब झाली तर तुम्हाला जगणं देखील कठीण होऊन बसेल.
चाणक्य म्हणतात सतत नव्या गोष्टी शिका, नवे विचार आत्मसात करा, यामुळे तुम्ही कधीही कोणाचे मानसिक गुलाम होणार नाहीत. स्वतंत्र विचार करण्याची क्षमता तुमच्यामध्ये विकसीत करा. तेव्हाच तुम्ही एखादा निर्णय चांगल्या प्रकारे घेऊ शकता. तुम्ही जर एखाद्या गोष्टीवर अत्याधिक अवलंबून राहिलात तर तो तुमच्यासाठी धोक्याचा इशारा असू शकतो, त्यामुळे कोणाचाही मानसिक गुलाम न होण्यातच तुमचं हित आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)