
गणेशोत्सव अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या घराघरात उत्साहाचं वातावरण आहे. सध्या घरात मखर, रोषणाई, मोदक आणि इतर तयारी सुरु आहे. गणपती बाप्पा म्हटलं की आरती ही येतेच. काही लोक प्रथेप्रमाणे दिवसातून दोन वेळा किंवा तीन वेळा आरती करतात. या आरतीसाठी आपण आरती संग्रह, टाळ, ढोलकी अशी सर्व काही व्यवस्था करतो. पण अनेकदा पुस्तक समोर असूनही आरती म्हणताना आपण गोंधळून जातो. काहींना तर आरती पूर्ण पाठ नसते, तर काहींना पाठ असूनही उच्चार योग्य माहीत नसतात. यामुळे नकळतपणे आपल्याकडून अनेक चुका होतात.
दरवर्षी गणेशोत्सवाआधी आरतीमधील चुकीचे उच्चार सोशल मीडियावर फिरतात आणि त्यावर अनेक विनोद तयार होतात. बाप्पा मोठा मनाचा असल्याने तो सगळ्या चुका पोटात घालतो, पण आपण मात्र या चुका टाळायलाच हव्यात. याच पार्श्वभूमीवर आज आपण गणपती, शंकर आणि देवीच्या आरतीमधील काही सामान्य चुका कोणत्या आणि त्याचे योग्य उच्चार कोणते याबद्दल जाणून घेऊया.
| चुकीचे उच्चार | योग्य उच्चार |
| नुरवी पुरवी प्रेम कृपा देवाची! | कृपा जयाची |
| रत्नखचित करा | रत्नखचित फरा |
| संकष्टी पावावे | संकटी पावावे |
| ओटी शेंदुराची | उटी शेंदुराची |
| वक्रतुंड त्रिनेमा | वक्रतुंडत्रिनयना |
| दास रामाचा वाट पाहे सजणा | दास रामाचा वाट पाहे सदना |
| फळीवर वंदना | फणिवरबंधना |
| ओवाळू आरत्या कुरवंट्या येती | कुरवंडया येती |
| कायेन वाचा मच्छिन्द्र देवा | मनसेंद्रियैर्वा |
| दीपक जोशी नमोस्तुते | दीपज्योती नमोस्तुते |
| क्लेशापासून तोडी तोडी भवपाशा | क्लेशांपासूनि सोडवि तोडी भवपाशा |
| सेतू भक्तालागी | ते तू भक्तालागी, पावसी लवलाही |
| व्याघ्रांबर फणिवरदर | व्याघ्रांबर फणिवरधर |
| लवलवती विक्राळा | लवथवती विक्राळा |
दरम्यान गणेशोत्सव हा केवळ पूजाविधीचा उत्सव नसून तो श्रद्धेचा, आनंदाचा आणि उत्साहाचा उत्सव आहे. देवासाठी तुमचे प्रामाणिक भाव आणि शुद्ध अंतःकरण महत्त्वाचे असते. त्यामुळे यापुढे आरती करताना कायम योग्य उच्चार करायला हवे. त्यामुळे या गणेशोत्सवामध्ये बाप्पाचे स्वागत योग्य उच्चारांसह आणि शुद्ध भावाने करुया.