
सामान्यपणे आपण दिवसभरात जो विचार करतो, किंवा जी घटना आपल्याला अशीच घडावी असं मनातून वाटत असतं, ते स्वप्न आपल्याला रात्री पडू शकतं, अशी अनेक स्वप्न असतात, जी तुम्हाला रात्री गाढ झोपेत पडतात, त्याला काहीच अर्थ नसतो, परंतु धर्मशास्त्रामध्ये असं देखील म्हटलं आहे की, काही स्वप्न ही भविष्यात तुमच्यासोबत ज्या घटना घडणार आहेत, त्याचे संकेत देखील असू शकतात. स्वप्नशास्त्रामध्ये तुम्हाला पडणारी स्वप्न त्याचा आर्थ काय होऊ शकतो? आणि भविष्यात तुमच्यासोबत घडणाऱ्या एखाद्या गोष्टीची ही चाहुल असू शकते का? याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे, त्यामुळे आज आपण अशा काही स्वप्नांबद्दल माहिती घेणार आहोत, जी स्वप्न तुम्हाला पडली तर लवकरच तुमचा भाग्योदय होऊ शकतो, अशा स्वप्नांना स्वप्नशास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानलं गेलं आहे.
फुलांनी बहरलेलं गार्डन – जर तुमच्या स्वप्नामध्ये फुलांनी बहरलेली एखादी सुंदर बाग आली तर हे अत्यंत शुभ स्वप्न मानलं जातं. या स्वप्नाचा अर्थ असा होतो, की तुम्हाला आता तुमच्या आयुष्यात लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. तुम्ही एखाद्या कामाची नव्याने सुरुवात करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. मात्र जर तुम्हाला असं स्वप्न पडलं असेल तर ते इतरांना कधीही सांगू नका, असा सल्ला देखील स्वप्नशास्त्रामध्ये देण्यात आला आहे, कारण त्यामुळे अशा स्वप्नाचा प्रभाव कमी होतो, अशी मान्यता आहे.
चांदीच्या नाण्यांनी भरलेला कलश – जर तुमच्या स्वप्नामध्ये चांदीच्या नाण्यांनी भरलेला कलश आला तर असं सप्न खूपच शुभ मानलं जातं, याचा अर्थ तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त झाला असून, लवकरच तुमच्या आयुष्यात प्रचंड धन आणि वैभव येणार आहे, तुमचा भाग्योदय होणार आहे, असा होतो.
देवांचं दर्शन – स्वप्न शास्त्रानुसार जर तुमच्या स्वप्नात देव आले, तुम्हाला स्वप्नात देवी देवतांचं दर्शन झालं तर हे खूपच शुभ संकेत आहेत, याचा अर्थ असा होतो, की तुमच्यावर देवांची कृपा झाली आहे, लवकरच तुमच्या आयुष्यातील सर्व कष्ट आणि दु:ख दूर होणार आहेत, हे एक सकारात्मक स्वप्न आहे.
आरशामध्ये स्वत:ला पहाणं – जर स्वप्नामध्ये तुम्ही स्वत:ला आरशात पहात असाल तर हे अत्यंत शुभ स्वप्न मानलं जातं, याचा अर्थ लवकरच तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडणार असून, हा बदल सकारात्मक असणार आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)