अमरनाथ यात्रेसाठी कसे कराल रजिस्ट्रेशन? येथे मिळेल संपूर्ण माहिती
Shri Amarnath Yatra Registration : अमरनाथ यात्रा करण्याचे भाग्य तुम्हाला पण मिळू शकते. त्यासाठी नाव नोंदणी करणे गरजचे आहे. 38 दिवसांच्या या यात्रेसाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. कसा करतात या यात्रेसाठी रजिस्ट्रेशन?

हिंदू धर्मात अमरनाथ यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी अनेक भक्त प्रतिक्षेत आहेत. ही यात्रा सुरू करण्यासाठी अनेकांनी ऑनलाईन नोंदणी केली असली तरी काहींना इंटरनेट अथवा साईटने धोका दिला असेल. त्यामुळे त्यांची नाव नोंदणी झाली नसेल. अमरनाथ यात्रा 3 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत चालेल. विना नाव नोंदणी कुणालाच यात्रेत सहभागी होण्याची अनुमती नाही. नोंदणी केंद्रावर भाविक भक्तांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. टोकन मिळवण्यासाठीच मोठी कसरत करावी लागत आहे. तुम्हाला पण 38 दिवस चालणार्या अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी करायची असेल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धती समजून घ्या.
अमरनाथ यात्रेसाठी अशी करा नोंदणी
अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला सर्वात अगोदर श्री अमरनाथजी श्राईन बोर्डाचे (SASB) संकेतस्थळ jksasb.nic.in ला भेट द्यावी लागेल. या यात्रेसाठी संबंधित सर्व कागदपत्रे डिजिटल अपलोड करावे लागतील. तुम्ही यात्रेचा स्लॉट पण अगोदरच बुक करू शकता. त्यानंतर यात्रा परमिट रजिस्ट्रेशनचे बटण दाबा. येथे तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल. यामध्ये यात्रेचा रस्ता, यात्रा तारीख, यात्रेविषयीची संपूर्ण माहिती आणि आरोग्यविषयक माहिती द्यावी लागेल. हे केल्यानंतर तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो, आयडी आणि मेडिकल सर्टिफिकेट यांची कॉपी अपलोड करावी लागेल. तुमच्यासमोर आता पेमेंटचा पर्याय येईल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही यात्रेचे परमिट डाऊनलोड करू शकता.
ऑफलाईन नोंदणीचा असा आहे पर्याय
श्री अमरनाथ श्राईन बोर्डाने ऑफलाईन रजिस्ट्रेशनसाठी देशभरातली 533 बँक शाखांना अधिकृत म्हणून जाहीर केले आहे. यामध्ये पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, जम्मू-काश्मीर बँक आणि यस बँकेच्या शाखांचा समावेश आहे. या शाखांमध्ये तुम्हाला केवायसी आणि आरोग्य प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्यानंतर यात्रेसाठीचे शुल्क अदा करावे लागेल. त्यानंतर यात्रेसाठीचा पास मिळेल.
12,348 भाविकांनी घेतले दर्शन
अमरनाथ यात्रा गुरुवारपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी संध्याकाळपर्यंत 12,348 भाविकांनी पवित्र गुफेत बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतले. यामध्ये 9,181 पुरूष आणि 2,223 स्त्रियांचा समावेश होता. तर 99 मुलं, 122 साधू, 7 साध्वी, 708 सुरक्षा दलातील जवान आणि 8 ट्रान्सजेंडरचा पण भाविकांमध्ये समावेश होता. टोकनची सुविधा सुरू झाली आहे. त्यामुळे भाविकांना नोंदणी करता येणार आहे.
