इंदिरा एकादशीला ‘या’ नियमांचे पालन केल्यास तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे मिळतील आशीर्वाद
श्राद्ध पक्षात येणारी एकादशी तिथी खूप विशेष आणि महत्त्वाची मानली जाते. इंदिरा एकादशी पितृपक्षात येते. तुम्ही या एकादशीला या गोष्टी लक्षात ठेवल्यास व या नियमांचे पालन केल्यास पूर्वजांचे आशिर्वाद मिळतात.

हिंदू धर्मात एकादशी व्रताला विशेष महत्त्व आहे. वर्षात एकूण 24 एकादशी व्रत पाळले जातात, ज्यामध्ये दर महिन्याला 2 एकादशी येतात. म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशीचे व्रत केले जाते. तर प्रत्येक एकादशीचे व्रत पुण्य फळ प्राप्तीसाठी फार महत्वाचे मानले जाते. तर आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशी म्हणून ओळखले जाते. इंदिरा एकादशी व्रत पितृपक्षात येते. या एकादशीला काही विशेष नियमांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे, तरच पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात.
2025 मध्ये, इंदिरा एकादशीचे व्रत बुधवार, 17 सप्टेंबर 2025 रोजी आहे. इंदिरा एकादशीच्या दिवशी कृष्ण पक्षाच्या किंवा शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांसाठी श्राद्ध कर्म केले जाते.
इंदिरा एकादशीच्या व्रताच्या दिवशी काय करावे?
- इंदिरा एकादशीच्या व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. उपवास करण्याचा आणि भगवान विष्णूची पूजा करण्याचा संकल्प करा.
- इंदिरा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला जल अर्पण करा आणि दिवा लावा.
- इंदिरा एकादशीचे व्रत पितृपक्षात येते, म्हणून या दिवशी पूर्वजांचे स्मरण करणे आणि त्यांच्या नावाने दान करणे खूप शुभ मानले जाते.
- या दिवशी भगवान विष्णू यांच्या नावाचा जप करा.
- या दिवशी तुमच्या घरी येणाऱ्या कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका.
- या दिवशी गायी आणि कावळ्यांना खाऊ घाला.
इंदिरा एकादशीच्या व्रताच्या दिवशी काय करू नये?
- इंदिरा एकादशीच्या व्रताच्या दिवशी मांसाहार टाळा. या दिवशी धान्य, मांस, कांदा, लसूण खाऊ नका.
- एकादशीच्या व्रताच्या दिवशी खोटे बोलू नका, रागावू नका.
- या दिवशी मद्यपान अजिबात करू नका.
- कोणत्याही प्रकारच्या भांडणात सहभागी होऊ नका किंवा अपशब्द वापरू नका.
- प्राण्यांना आणि पक्ष्यांना त्रास देऊ नका, त्याऐवजी त्यांना अन्न आणि पाणी द्या.
- श्राद्धकाळ असल्याने या दिवशी विलासिता आणि दिखावा टाळा.
इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने व या नियमांचे पालन केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
