
भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. त्यामुळे हा दिवस कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. यंदा कृष्ण जन्माष्टमी १६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णांच्या बालस्वरूपाची विशेष पूजा केली जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने अनेक जण उपवास करतात. या उपवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा मुहूर्त काय, उपवास कधी सोडावा, पूजा कशी करावी, याबद्दल जाणून घेणार आहोत.
पंचांगानुसार, जन्माष्टमीची अष्टमी तिथी १५ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी सुरू होईल. यानंतर १६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजून ३४ मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल. त्यामुळे तिथीनुसार उद्या १६ ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा सण साजरा करणे अधिक योग्य ठरेल. श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा रात्रीच्या वेळी केली जाते. कारण श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता.
यंदा पूजेचा शुभ मुहूर्त रात्री १२ वाजून ४ मिनिटांपासून ते रात्री १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत आहे. म्हणजेच पूजेसाठी एकूण ४३ मिनिटांचा वेळ तुम्हाला मिळेल. श्रीकृष्ण जन्माष्टमीची अष्टमी तिथी प्रारंभ १५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी सुरु होईल. यानंतर १६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजून ३४ मिनिटांनी अष्टमी तिथी संपेल. या काळात रात्री १२ वाजून ४ मिनिटांपासून ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत पूजेसाठीचा योग्य मुहूर्त असेल.
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास सोडण्याची प्रत्येकाकडे वेगवेगळी परंपरा आहे. काही जणांच्या मते, रात्री १२ वाजता श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानंतर हा उपवास सोडावा. मात्र, शास्त्रानुसार, जन्माष्टमीचा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो. हा उपवास सोडताना भगवान श्रीकृष्णांना अर्पण केलेला प्रसाद खावा, असे म्हटले जाते.
जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णांच्या मूर्तीला पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर) आणि नंतर शुद्ध पाण्याने अभिषेक घाला. त्यांना नवीन वस्त्र, दागिने आणि मुकुट परिधान करा. पूजेच्या वेळी त्यांना लोणी-साखर आणि इतर प्रिय पदार्थांचा नैवेद्य अर्पण करा. मध्यरात्री १२ वाजता आरती करून शंखनाद करा आणि त्यांचा जन्मोत्सव साजरा करा. या पूजेदरम्यान ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ किंवा श्रीकृष्णांच्या इतर मंत्रांचा जप करा. यामुळे मन शांत होते. तसेच सकारात्मक ऊर्जा मिळते. पूजेनंतर सर्व प्रसाद वाटून टाका. त्यानंतर स्वतःही प्रसाद ग्रहण करा.
जन्माष्टमीचा उपवास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा उपवास केल्याने भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच सर्व पापांचा नाश होतो, अशी श्रद्धा आहे. जन्माष्टमीचा उपवास असताना तुम्ही फलाहार करु शकता. पण मांसाहार भोजन घेऊ नये. ज्यांना संतती हवी आहे, त्यांनी हे व्रत केल्यास त्यांना पुत्ररत्न प्राप्ती होते, असे मानले जाते. या व्रताने धन, संपत्ती आणि सर्व प्रकारची सुख-समृद्धी प्राप्त होते.