भारतातील असं चमत्कारिक मंदिर जिथे दर्शन घेतल्यास किडनीचे आजार बरे होतात? पाहा काय आहे सत्य…
भारतातील असं एक मंदिर ज्याबद्दल भाविकांचा असा विश्वास आहे की मंदिरात दर्शन घेतल्याने किडनी स्टोन किंवा किडनीसंबंधीत कोणतेही आजार बरे होतात. कुठे आहे हे मंदिर आणि काय आहे यामागील सत्य जाणून घेऊयात.

आरोग्यासाठी आपण जे काही चांगलं आहे त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न नक्कीच करतो. कारण आजकालच्या धावपळीच्या दिनचर्येत आरोग्य चांगलं ठेवणं खरोखरंच एक टास्क आहे. पण कधी कधी काही आजार असे होतात त्यावर वर्षानुवर्ष उपचार सुरुच असतात. मग अशावेळी ती व्यक्ती नक्कीच उपचारांसोबतच श्रद्धेचा, भक्तीचा मार्ग स्विकारते.
भारतातील एक चमत्कारिक मंदिर जिथे व्यक्तीच्या किडनीशी संबंधित आजार बरे होतात
भारतात असंच एक चमत्कारिक मंदिर आहे, ज्याबद्दल असे म्हटले जाते की येथे दर्शन आणि पूजा केल्याने व्यक्तीच्या किडनीशी संबंधित समस्या दूर होतात. होय, हे मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. तामिळनाडूच्या त्रिची जिल्ह्यात असलेल्या या मंदिराचे नाव ऊट्टाथुर शुद्ध रत्नेश्वर मंदिर आहे. हे प्राचीन शिव मंदिर विशेषतः किडनीच्या आजारांवर जसे की किडनी स्टोन, जुनाट किडनीचा आजार आणि इतर किडनीशी संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरात असं काय खास आहे ते जाणून घेऊया.
मंदिराची वैशिष्ट्ये
ऊट्टाथुर शुद्ध रत्नेश्वर मंदिराबद्दल, भाविकांचा असा विश्वास आहे की या मंदिरात पूजा, अभिषेक आणि विशेष विधी केल्याने मूत्रपिंडाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
किडनीच्या आजारांसाठी मंदिर का प्रसिद्ध आहे?
ऊट्टाथुर शुद्ध रत्नेश्वर मंदिर हे किडनीच्या आजारांसाठी चमत्कारिक मानले जाते. भाविकांचा असा विश्वास आहे की मंदिरातील ब्रह्म तीर्थ म्हणजे तेथील विहिरीचे पाणी हे पवित्र मानले जाते. हे पाणी प्यायल्याने आणि नटराजाची पूजा केल्याने किडनीच्या समस्यांपासून आराम मिळतो. या विहिरीच्या पाण्यात सर्व पवित्र नद्यांचे पाणी एकत्र असल्याचं आणि त्यात अनेक औषधी गुणधर्म असल्याचं म्हटलं जातं. येथे येणारे भाविक अभिषेक केल्यानंतर हे पाणी पितात. येथे येणारे अनेक भाविक असा दावा करतात की हे पाणी 48 दिवस प्यायल्याने आणि नियमित प्रार्थना केल्याने किडनी स्टोन आणि इतर समस्यांमध्ये सुधारणा होते. असे अनुभव देखील आल्याचं म्हटलं जातं.
View this post on Instagram
मंदिरातील दर्शनाच्या वेळा
मंदिरात दर्शनाची वेळ सकाळी 6 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 8 अशी आहे.
मंदिरात पोहोचायचे कसे?
ऊट्टाथुर शुद्ध रत्नेश्वर मंदिर त्रिचीपासून 30 किमी आणि पडालूरपासून 5 किमी अंतरावर आहे. सर्वात जवळचे विमानतळ त्रिची आंतरराष्ट्रीय विमानतळ सुमारे 35 किमीवर आहे आणि रेल्वे स्टेशन लालगुडी किंवा त्रिची जंक्शन आहे. जर तुम्ही बाय रोड येत असाल, तर त्रिची-चेन्नई महामार्गावर बस किंवा टॅक्सीने सहज पोहोचता येते.
( महत्त्वाची टीप: श्रद्धेचे स्वतःचे असे एक वेगळे महत्त्व आहे. पण केवळ भक्तीने तुम्ही कोणताही आजार बरा करू शकत नाही. गंभीर आजारांसाठी किंवा कोणत्याही आरोग्यविषयक समस्येसाठी वैद्यकीय उपचार, डॉक्टरांचा सल्ला घेणे, श्रद्धेसोबतच डॉक्टरांचे उपचार घेणेही तितकेच महत्त्वाचे असते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
