उजव्या बाजूला साप दिसला तर काय होतं? सफेद, सोनेरी आणि मृत सापाचे अर्थ
रस्त्यात साप दिसल्यास अनेकांना भीती वाटते, पण शकुन शास्त्रानुसार त्याचे विविध अर्थ असू शकतात. उजव्या-डाव्या बाजूला साप दिसणे, सफेद किंवा मेलेला साप पाहणे याला शुभ-अशुभ संकेत मानले जाते. या लेखात रस्त्यातील सर्प दर्शनाचे विविध पैलू आणि त्यामागील मान्यतांची माहिती दिली आहे, मात्र याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

साधारणपणे सापाला पाहिल्यावर प्रत्येकाला घाम फुटतो. कारण सापाने थोडा जरी दंश केला तरी काम तमाम होते. जगण्याची शाश्वती सर्वात कमी असते. त्यामुळे लोक सापाला घाबरतात. रस्त्यात साप दिसल्यावर लोक घाबरून तिथून धूम ठोकतात. काही क्रूर लोक सापाला मारतात. पण रस्त्यात साप दिसणं हे कशाचं लक्षण आहे? रस्त्यात साप दिसणं हे शुभ लक्षण आहे का? शकून शास्त्रानुसार रस्त्यात साप दिसला आणि अनेकदा दिसला तर घाबरू नका. मन विचलित होऊ देऊ नका. सकारात्मक राहा. पण साप दिसल्यावर त्याला इजाही करू नका.
काही परिस्थितींमध्ये रस्त्यात साप दिसणं हे चांगलं लक्षण मानलं जातं. त्यामुळे खुशखबर मिळण्याचे संकेत असतात. काही परिस्थितीत साप दिसणं म्हणजे संकटाची चाहूलही मानली जाते. तुम्हाला साप कधी आणि कोणत्या स्थितीत दिसला यावर सर्व काही अवलंबून असतं. शकून शास्त्राच्या मान्यतेनुसार, वेगवेगळ्या परिस्थितीत साप दिसण्याचे काय अर्थ निघतात ते आपण पाहू.
उजव्या बाजूला साप दिसणं
तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघाला आहात आणि तुमच्या उजव्या बाजूला साप दिसला तर काही मान्यतेनुसार हे शुभ असतं. तुमच्या कामात यश मिळण्याची आणि कामातील अडथळे दूर होण्याचे हे संकेत असल्याचं सांगितलं जातं.
डाव्या बाजूला साप दिसणं
याच्या उलट, रस्त्याच्या डाव्या बाजूला साप दिसला तर काही मान्यतेनुसार सावध राहिलं पाहिजे. पण याच्याशी संबंधित मान्यता वेगवेगळ्या आहेत. साप कोणत्या दिशेला दिसला म्हणजे काय होईल? याचं काही प्रमाण नाहीये. त्याला काही वैज्ञानिक आधार नाहीये.
सफेद वा सोनेरी साप
शकून शास्त्राशी संबंधित मान्यतेनुसार, सफेद वा सोनेरी रंगाचा साप दिसणं शुभ मानलं जातं. त्यामुळे धन लाभ, सुख समृद्धी आणि आर्थिक स्थितीत सुधार होण्याचे संकेत मिळतात. पण या मान्यतेलाही कोणताही वैज्ञानिक आधार नाहीये.
मेलेला साप
जर रस्त्यात मेलेला साप दिसला तर काही लोक त्याला अशुभ संकेत मानतात. तर काही मान्यतांमध्ये येणाऱ्या समस्यांशी त्याला जोडून पाहिलं जातं. पण मृत साप पाहणं याचा कोणत्याही घटनेशी काही संबंध नाहीये.
साप आडवा जाणं
बऱ्याचदा लोक रस्त्यात साप आल्याने घाबरतात. शकून शास्त्राच्या मान्यतेनुसार, सापाने रस्त्यातून जाणं जीवनाच्या बदलाचे संकेत मानलं जातं. काही मान्यतेनुसार, अचानक आनंदाची बातमी मिळणं किंवा प्रवास योगाची शक्यता वर्तवली जाते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
