हजारो भक्त्तांच्या उपस्थितीत रंगला सिध्दरामेश्वरांचा विवाह सोहळा, काय आहे या सोहळ्याचं वैशिष्ट्य
एका कुंभाराची कन्या सिद्धेश्वर महाराजांची भक्त होती आणि ती त्यांच्यासोबत विवाह करू इच्छित होती. मात्र महाराज हे योगीपुरूष असल्यामुळे त्यांनी कुंभार कन्येला लग्नास स्पष्ट नकार दिला. मात्र भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या जवळच्या योग दंडासोबत विवाह करण्यास सांगितले. कुंभार कन्या त्या गोष्टीला राजी झाली. त्यामुळे योगदंडाची विधिवत पुजा करून हा विवाह सोहळा पार पडतो.

सागर सुरवासे, सोलापूर : दरवर्षी मकर संक्रातीला सिद्धरामेश्वराची यात्रा (Siddharameshwar Yatra) साजरी होत असते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथील लोकांचं श्रध्दास्थान असलेले सोलापुरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेला धार्मिक विधीसह परंपरेनुसार सुरूवात झालीय. पाच दिवस ही यात्रा चालणार असून यात्रेचं प्रमुख आकर्षण असलेला अक्षता सोहळ्याचा विधी आज संपन्न झाला. या यात्रेचं मुख्य आकर्षण असतो तो म्हणजे सिध्दरामेश्वरांचा विवाह सोहळा.
असे आहे या सोहळ्याचे वैशिष्ट्यं
या विवाह सोहळ्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे यात्रेच्या पारंपारिक बाराबंदी वेशभूषा मध्ये उपस्थित होते. तर काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे हे आपल्या कुटुंबासह अक्षता सोहळ्याला हजर होते. एका कुंभाराची कन्या सिद्धेश्वर महाराजांची भक्त होती आणि ती त्यांच्यासोबत विवाह करू इच्छित होती. मात्र महाराज हे योगीपुरूष असल्यामुळे त्यांनी कुंभार कन्येला लग्नास स्पष्ट नकार दिला.
मात्र भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या जवळच्या योग दंडासोबत विवाह करण्यास सांगितले. कुंभार कन्या त्या गोष्टीला राजी झाली. त्यामुळे योगदंडाची विधिवत पुजा करून हा विवाह सोहळा पार पडतो. कसबा परिसरात असणाऱ्या हिरेहब्बू वाड्यातून या विवाह सोहळ्यासाठी विधिवत पुजा करून नंदीध्वजाची मिरवणूक काढली जाते. हे नंदीध्वज समाजाच्या सर्व जातीचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे ही यात्रा राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवते. या सोहळ्यासाठी हजारो भक्तगण उपस्थित असतात.
आगळ्या वेगळ्या या विवाह सोहळ्यात सिध्दरामेश्वरांचे भक्त पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान करतात. बारा बंद असल्यानं या पोषाखाला बारा बंदी म्हणतात. बाराबंदीचा मानही आठरा पगड जातीला मिळतोय. समजातल्या सर्व जाती धर्मांना या यात्रेत सामवून घेतल जात. कुठलाही भेदभाव, कुठल्याही निमंत्रणाशिवाय लोक या यात्रेला हजेरी लावतात. यात राजकीये नेतेदेखील मागे नसतात.