
वास्तुशास्त्रानुसार जेवणाचा संबंध हा ऊर्जेशी जोडला गेलेला आहे, म्हणजे आपण जे काही जेवण करतो, त्यामधून आपल्याला ऊर्जा मिळते. मात्र अनेकजण जेवताना योग्य त्या नियमांचं पालन करत नाहीत, चुकीच्या पद्धतीने जेवतात. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुमच्या घरात जेव्हा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा त्याचा परिणाम हा तुमच्या एकट्यावर होत नाही, तर तो तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होतो. घरात जर नकारात्मक ऊर्जा असेल तर विविध समस्या निर्माण होतात. जसं की घरावर कर्ज वाढतं, काहीही कारण नसताना भांडणं होतात, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे असे वास्तुदोष टाळण्यासाठी योग्य पद्धतीने जेवणं करणं गरजेचं असतं. वास्तुशास्त्रात असं देखील म्हटलं आहे की, आपण कोणत्या प्रकारचं अन्न सेवन करतो? त्यावर आपला स्वभाव देखील अवलंबून असतो. चला तर मग जाणून घेऊयात जेवताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत?
वास्तुशास्त्रानुसार पती-पत्नीने कधीही एका ताटामध्ये जेवू नये, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात गृहकलह वाढतो. वास्तुशास्त्रानुसार कुंटुबातील प्रत्येक व्यक्तीची एक जबाबदारी निश्चित करण्यात आलेली असते, घरातील जो कुटुंब प्रमुख असतो, त्याच्यावर आपल्या पत्नीसोबतच घरातील सर्व सदस्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी असते. अशा परिस्थितीमध्ये जर कुटुंब प्रमुख आणि त्याची पत्नी जर एका ताटात जेवले तर अशा वेळी कुटुंब प्रमुखाचं त्याच्या पत्नीवर असलेलं प्रेम तर वाढतं, मात्र कुटुंबातील इतर सदस्यांकडे त्याचं दुर्लक्ष होतं. त्यामुळे घरात काहीही कारण नसताना वाद विवाद होतात, भांडणं होतात. त्यामुळे कधीही पत्नीसोबत एका ताटात जेवू नये, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.
ज्या प्रमाणे पती आणि पत्नीने एका ताटात जेऊ नये, त्याचप्रमाणे कधीही बेडवर बसून सुद्ध जेवू नये, असं केल्यास तो अन्नाचा अपमान समजला जातो, त्यामुळे घरात अनेक प्रकारचे वास्तुदोष निर्माण होतात. तुम्ही मोठ्या आर्थिक संकटात देखील सापडू शकता, घरात बरकत राहत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)