
आपलं घर सुंदर दिसावं, आकर्षक दिसावं, घरात कोणीही आलं तरी त्याला दिसताच क्षणी आपलं घर आवडावं, यासाठी आपण आपलं घर वेगवेगळ्या पद्धतीनं सजवत असतो. यामध्ये झाडांचा देखील समावेश आहे. आपण आपल्या घरात वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावत असतो, मात्र वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं असतात, ते आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, ज्याचा प्रभाव हा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर पडतो, आणि घरात वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. मात्र दुसरीकडे अशी देखील काही झाडं असतात, जी घरात लावल्यानंतर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, घरावर सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो. आज आपण अशाच काही झाडांची माहिती घेणार आहेत, जी घरात लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.
घरातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी
वास्तुशास्त्रामध्ये मनी प्लांटच्या झाडाला खूपच शुभ मानलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही मनी प्लांटचं झाड हे दक्षिण -पूर्व दिशेला लावलं तर त्याचा खूपच सकारात्मक प्रभाव हा तुमच्या कुटुंबावर पडतो. या झाडाला घरामध्ये लावणं खूप शुभ मानलं जातं. ज्या घरात हे झाड असतं, त्या घरात सदैव पैसा टिकून राहतो, तिजोरी पैशांनी भरलेली राहते, कधीही आर्थिक संकट येत नाही.
घरातील सकारात्मक ऊर्जेसाठी
वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर त्याचा प्रभाव हा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर पडतो. त्यामुळे घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या घरात लकी बांबूचे झाड लावले, तर सदैव सकारात्मक ऊर्जा राहते. घर स्थिर राहतं, घरामध्ये वादविवाद, भांडणं होत नाहीत. घर आर्थिक दृष्या देखील स्थिर राहतं, लकी बांबूचं झाडं हे नेहमी पूर्व दिशेला ठेवावं.
हे झाड देखील आहे खूप शुभ
वास्तुशास्त्रानुसार शमीच्या झाडाला देखील अत्यंत शुभ मानण्यात आलं आहे. शमीच्या झाडाचं अध्यात्मिक महत्त्व देखील खूप मोठं आहे, त्यामुळे या झाडाची पूजा केली जाते. ज्या घरामध्ये शमीचं झाडं आहे, त्या घरावर कुठलंही अकस्मात संकट येत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. जर एखाद्या व्यक्तीला शनि देवांची साडेसाती असेल तर अशा व्यक्तीनं हे झाडं आवश्य लावावं, त्यामुळे साडेसातीचा प्रभाव कमी होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. मात्र हे झाड घरात लावू नये तर मोकळ्या जागी, म्हणजे घरासमोर, बाल्कनीत किंवा टेरेसवर लावावे, असंही वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.