मृत व्यक्तीच्या वस्तू आपण वापरु शकतो का, जाणून घ्या काय सांगतं गरुड पुराण?

घरातील व्यक्तीच्या निधनानंतर तिने वापरलेल्या वस्तूंचं काय करायचं? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. पण यासाठी देखील गरुड पुराणात काही नियम दिले आहेत. तर जाणून घ्या मृत व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या वस्तूंचं काय करायचं.

मृत व्यक्तीच्या वस्तू आपण वापरु शकतो का, जाणून घ्या काय सांगतं गरुड पुराण?
| Updated on: Oct 04, 2026 | 3:07 PM

एका व्यक्तीच्या अनेक आवडत्या वस्तू असू शकतात. पण व्यक्ती जाते आणि सर्वकाही येथेच सोडून जाते असं आपण म्हणतो… अशात व्यक्तीच्या निधनानंतर तिच्या वस्तूंचं काय करायचं? असा प्रश्न अनेकांना पडतो. सांगायचं झालं तर, हिंदू धर्म आणि गरुड पुराणानुसार , असं मानलं जातं की, एखाद्या व्यक्तीच्या काही वस्तूंप्रति आत्म्याचं आकर्षण किंवा ओढ त्यांच्या मृत्यूनंतरही टिकून राहतं. म्हणूनच ज्योतिषी आणि धर्मपंडित असा सल्ला देतात की, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर लगेचच त्याच्या काही वस्तू परिधान करणं किंवा वापरणं शुभ नसतं. मृत व्यक्तीच्या वस्तूंची विल्हेवाट कशी लावावी यासंबंधी गरुड पुराणात काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत.

मृत व्यक्तीचे कपडे आणि दागिने : मृत व्यक्तीच्या कपड्यांमध्ये त्यांची बरीच ऊर्जा सामावलेली असते. त्यामुळे, त्यांनी घातलेले कपडे कुटुंबाने लगेच घालू नयेत. ते कपडे गरीब किंवा गरजू लोकांना दान करणे शुभ मानले जाते. सोन्या-चांदीच्या दागिन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, ते लगेच घालण्याऐवजी, पारंपरिक पद्धतीने म्हणजे, गंगाजल ओतून किंवा वितळवून पुन्हा घडवून शुद्ध केल्यानंतरच वापरावेत किंवा ते कौटुंबिक मालमत्ता म्हणून जपून ठेवता येतात.

Loading...

घड्याळे आणि वैयक्तिक वस्तूंचा वापर : असं मानलं जातं की मृत व्यक्तीने वापरलेले घड्याळ आणि इतर वैयक्तिक वस्तू त्यांच्या ऊर्जेशी घनिष्ठपणे जोडलेल्या असतात. असं मानलं जातं की, बंद पडलेले किंवा मृत व्यक्तीचे घड्याळ वापरल्याने व्यक्तीच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा किंवा अडथळे येऊ शकतात. त्यामुळे, अशा वस्तू स्मारक म्हणून योग्य आणि पवित्र ठिकाणी ठेवाव्यात किंवा दान कराव्यात.

आत्मिक मुक्ती आणि सकारात्मक ऊर्जेची निर्मिती :  मृत व्यक्तीच्या वस्तूंचे योग्य रीतीने दान केल्याने किंवा त्यांची विल्हेवाट लावल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि मोक्षाचा मार्ग सुकर होतो. मृत व्यक्तीच्या वस्तूंशी जास्त आसक्त होण्याऐवजी, कुटुंबातील सदस्य धार्मिक विधींसारखी दानधर्माची कामे करून घरात सकारात्मक वातावरण टिकवून ठेवू शकतात.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us