Numerology: तुमचा मूलांक काय सांगतो? जन्मतारखेत दडलंय व्यक्तिमत्त्वाचं गुपित
Numerology: तुमच्या जन्मतारखेवरून तुमचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाची काही वैशिष्ट्ये जाणून घेता येतात. जन्मतारखेतील अंकांची बेरीज करून मिळणारा मूलांक तुमच्या काही खास गुणांकडे संकेत करतो. तुमचा मूलांक काय सांगतो, जाणून घ्या.

अंकशास्त्रात जन्मतारखेला विशेष महत्त्व दिले जाते. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा मूलांक काढला जातो आणि या मूलांकाच्या आधारे व्यक्तिमत्त्वातील काही गुण, विचार करण्याची पद्धत आणि अंतर्गत ताकद याबाबत अंदाज व्यक्त केला जातो. जर जन्मतारीख १ ते ९ दरम्यान असेल, तर तोच अंक मूलांक मानला जातो. मात्र जन्मतारीख दोन अंकी असल्यास त्या दोन्ही अंकांची बेरीज केली जाते. उदाहरणार्थ, २५ तारखेला जन्म झाला असल्यास २+५ = ७, त्यामुळे मूलांक ७ मानला जातो. अंकशास्त्रीय मान्यतेनुसार १ ते ९ या प्रत्येक मूलांकाची स्वतंत्र वैशिष्ट्ये आहेत.
मूलांक १
मूलांक १ असलेल्या व्यक्तींमध्ये नेतृत्व गुण असल्याचे अंकशास्त्र सांगते. अशा व्यक्तींना इतरांच्या मागे जाण्यापेक्षा स्वतःचा मार्ग तयार करणे आवडते. स्वतःवरचा विश्वास आणि आत्मविश्वास ही त्यांची प्रमुख ताकद मानली जाते.
मूलांक २
मूलांक २ असलेल्या व्यक्ती भावनांना अधिक महत्त्व देणाऱ्या असतात. इतरांच्या भावना आणि अडचणी समजून घेण्याची क्षमता त्यांच्यात असते. हीच संवेदनशीलता त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते.
मूलांक ३
या मूलांकच्या व्यक्तींमध्ये सकारात्मक दृष्टिकोन दिसतो. त्यांची बोलण्याची पद्धत प्रभावी असल्याने ते इतरांचे लक्ष वेधून घेऊ शकतात. आपल्या आजूबाजूचे वातावरण आनंदी ठेवण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचे मानले जाते.
मूलांक ४
मूलांक ४ असलेल्या व्यक्ती संकटाच्या काळातही संयम राखतात. धैर्य, शिस्त आणि सातत्य हे त्यांचे महत्त्वाचे गुण मानले जातात. त्या घाई करण्याऐवजी योग्य पद्धतीने पुढे जाण्यावर भर देतात.
मूलांक ५
या मूलांकच्या व्यक्तींना नवीन गोष्टी शिकणे, फिरणे आणि बदल अनुभवणे आवडते. एका ठिकाणी किंवा परिस्थितीत बांधून राहण्यापेक्षा त्यांना स्वातंत्र्य पसंत असते. कोणत्याही नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता ही त्यांची ताकद मानली जाते.
मूलांक ६
मूलांक ६ असलेल्या व्यक्ती आपल्या जवळच्या माणसांची काळजी घेणाऱ्या असतात. कुटुंब आणि मित्रांसाठी नेहमी उपलब्ध राहण्याची त्यांची वृत्ती असते. प्रेम, आपुलकी आणि इतरांची काळजी घेणे हे त्यांचे प्रमुख गुण मानले जातात.
मूलांक ७
मूलांक ७ असलेल्या व्यक्तींना स्वतःसोबत वेळ घालवणे आणि शांतपणे विचार करणे आवडते. त्यांची विचार करण्याची पद्धत खोल असते आणि स्वतःला समजून घेण्याकडे त्यांचा कल असतो. अंतर्ज्ञान आणि सखोल विचार ही त्यांची ताकद मानली जाते.
मूलांक ८
या मूलांकच्या व्यक्तींचा दृष्टिकोन व्यावहारिक असल्याचे अंकशास्त्रात मानले जाते. त्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात. योग्य आणि अयोग्य यातील फरक समजून घेण्याची क्षमता हा त्यांचा महत्त्वाचा गुण मानला जातो.
मूलांक ९
मूलांक ९ असलेल्या व्यक्ती इतरांच्या मदतीसाठी पुढे येतात, अशी मान्यता आहे. स्वतःपुरता विचार न करता इतरांच्या गरजांकडेही लक्ष देण्याची त्यांची वृत्ती असते. करुणा आणि निःस्वार्थ भाव ही त्यांची खास ताकद मानली जाते.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)
