दिवसभरात 15 विकेटस्, मेलबर्न कसोटी रंगतदार स्थितीत

दिवसभरात 15 विकेटस्, मेलबर्न कसोटी रंगतदार स्थितीत

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत मोठी रंगत आली आहे. कारण ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांत गुंडाळल्यानंतर, दुसऱ्या डावात भारताचीही बिकट अवस्था झाली आहे. तिसऱ्या दिवसअखेर भारताने 5 बाद 54 अशी मजल मारली आहे. मात्र भारताची ऑस्ट्रेलियावरील आघाडी 346 धावांची झाली आहे. त्यामुळे सध्याची खेळपट्टी पाहता भारत सुस्थितीत दिसत आहे. आज दिवसभरात […]

सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत मोठी रंगत आली आहे. कारण ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांत गुंडाळल्यानंतर, दुसऱ्या डावात भारताचीही बिकट अवस्था झाली आहे. तिसऱ्या दिवसअखेर भारताने 5 बाद 54 अशी मजल मारली आहे. मात्र भारताची ऑस्ट्रेलियावरील आघाडी 346 धावांची झाली आहे. त्यामुळे सध्याची खेळपट्टी पाहता भारत सुस्थितीत दिसत आहे. आज दिवसभरात ऑस्ट्रेलियाच्या 10 आणि भारताच्या 5 अशा मिळून 15 विकेट्स पडल्या. यामध्ये एकट्या जसप्रीत बुमराहने 6 तर ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सच्या 4 विकेट्सचा समावेश आहे. त्यामुळे चौथ्या दिवशी कोणते फलंदाज खेळपट्टीवर उभे राहतात ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, कांगारुंना 151 धावांत गुंडाळल्यानंतर भारताचे फ्रेश सलामीवीर मयांक अग्रवाल आणि हनुमा विहारी फलंदाजीसाठी मैदानात उतरले. जसप्रीत बुमराहने जशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांची पळता भुई थोडी केलीच तशी अवस्था ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने भारतीय फलंदाजांची केली. हनुमा विहारी आणि मयांक अग्रवालने टिच्चून फलंदाजी करत 28 धावांची सलामी दिली. मात्र हनुमा विहारीला कमिन्सने उस्मान ख्वाजाकरवी झेलबाद करत भारताला पहिला धक्का दिला. हनुमाने 13 धावा केल्या. त्यानंतर कमिन्सने मागे वळून पाहिलंच नाही. पुढच्याच षटकात कमिन्सने भारताचा हुकमी एक्का चेतेश्वर पुजाराला शून्यावर माघारी धाडलं. इतकंच नाही तर कर्णधार विराट कोहली शून्य आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेला अवघ्या 1 धावेवर बाद करुन, पॅट कमिन्सने हम भी किसीसे कम नही हे दाखवून दिलं.

वाचा: बुमराहच्या कौतुकासाठी सेहवागची आठवले स्टाईल कविता 

त्यानंतर हिटमॅन रोहित शर्मा फलंदाजीसाठी आला. रोहितने चाचपडत 18 चेंडू खेळून काढले. मात्र जिथे पुजारा, कोहली उभे राहू शकले नाहीत, तिथे रोहितही जास्त वेळ कसा उभा राहिल? रोहित शर्मा 5 धावा करुन माघारी परतला. त्याला हेजलवूडने बाद केलं. अर्धी टीम तंबूत परतली असताना, सलामीवीर मयांक अग्रवाल मात्र नांगर टाकून उभा आहे. तिसऱ्या दिवसअखेर मयांक अग्रवाल 28 आणि ऋषभ पंत 6 धावांवर खेळत आहेत.

ऑस्ट्रेलियाचा 151 धावांत खुर्दा

त्याआधी बॉक्सिंग डे कसोटीत भारताने वर्चस्व मिळवलं. भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 151 धावात गुंडाळला. त्यामुळे भारताला 292 धावांची मोठी आघाडी मिळाली. कांगारुंची फलंदाजी कापून काढण्यात मोठा वाटा उचलला तो म्हणजे जसप्रीत बुमराहने. एकट्या बुमराने ऑस्ट्रेलियाच्या तब्बल 6 विकेट्स काढल्या. बुमराहच्या तोफगोळ्यांसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना उभंही राहता येत नव्हतं. येईल तो फलंदाज बुमराहची गोलंदाजी चकवू पाहात होता, मात्र बुमराहने एकेकाला ओळीने तंबूत धाडलं.

बुमराने 15.5 षटकात अवघ्या 33 धावा देत तब्बल 6 विकेट्स घेतल्या. बुमराच्या तोफगोळ्यांसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची अक्षरश: दाणादाण उडाली. एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताने वर्चस्व मिळवलं आहे. या कसोटीत भारताने पहिल्या डावात 443 धावांवर पहिला डाव घोषित केला होता.

संबंधित बातम्या 

बुमराहच्या कौतुकासाठी सेहवागची आठवले स्टाईल कविता 

IndvsAus: बुमराहचे तोफगोळे, ऑस्ट्रेलिया 151 धावांत कोलमडली

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें