IND vs ZIM : टी20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत धावा का होत नव्हत्या? प्लेयर ऑफ द मॅच बनल्यानंतर हार्दिक पंड्याचा खुलासा

IND vs ZIM : एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने 4 विकेट गमावून 256 धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेच्या टीमने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 184 धावा केल्या.

IND vs ZIM : टी20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत धावा का होत नव्हत्या? प्लेयर ऑफ द मॅच बनल्यानंतर हार्दिक पंड्याचा खुलासा
Hardik Pandya
| Updated on: Feb 27, 2026 | 1:29 PM

टीम इंडिया काल झिम्बाब्वे विरुद्ध सुपर-8 राऊंडमधील दुसरा सामना खेळली. टी20 वर्ल्ड कप 2026 मधील अभियान कायम ठेवण्यासाठी टीम इंडियासाठी हा सामना करो या मरो होता. भारताने 72 धावांनी दमदार विजय मिळवला. 23 चेंडूत 4 सिक्स आणि 2 फोन मारुन नाबाद 50 धावा करणाऱ्या हार्दिक पंड्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’च्या पुरस्कारासाठी निवडलं गेलं. त्याने तिलक वर्मा (नाबाद 44) सोबत 31 चेंडूत 84 धावांची भागीदारी केली. एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने 4 विकेट गमावून 256 धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेच्या टीमने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 184 धावा केल्या.

मॅच जिंकल्यानंतर हार्दिक पंड्या मोकळेपणाने बोलला. “मी खूप खुश आहे. 23 चेंडूत 50 धावा ऐकायला थोडं वेगळं वाटतं. मला वाटतं की, मी जास्त जोरात मारायचा प्रयत्न करत होतो. मॅच दरम्यान जाणीव झाली की, मी टायमिंगवर विश्वास ठेऊनही सिक्स मारु शकतो. माझ्यासाठी हा लय बनवण्याच्या दृष्टीने चांगला सामना होता. कारण मागच्या काही सामन्यात मला जे करायचं होतं, ते करु शकलो नव्हतो. म्हणू मी आता समाधानी आहे” असं हार्दिक पंड्या म्हणाला.

त्यामुळे विकेट घेण्याची संधी मिळते

झिम्बाब्वे विरूद्धच्या या सामन्यात हार्दिक पंड्याने 3 ओव्हर गोलंदाजी केली. त्यात त्याने 21 धावा दिल्यात. किफायती गोलंदाजीबद्दल पंड्या बोलला की, “खूप चांगलं वाटलं. मला नवीन चेंडूने गोलंदाजी करायला आवडतं. त्यात स्विंग मिळतो. देवाच्या कृपने माझ्याकडे इन स्विंग आणि आऊट स्विंग दोघांमध्ये कौशल्य आहे. त्यामुळे विकेट घेण्याची संधी मिळते. फलंदाजांसाठी सुद्धा आव्हान असतं. मी याने संतुष्ट आहे”

त्या मॅचवर लक्ष होतं

गुरुवारच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिज विरुद्ध 9 विकेटने विजय मिळवला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिज वर विजय मिळवणं भारतासाठी महत्वाचं होतं. पंड्याला जेव्हा विचारलं की, त्यांचं दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज मॅचवर लक्ष होतं का?. “हो, आमच्या सगळ्यांच त्या मॅचवर लक्ष होतं. पण आता विषय चांगलं क्रिकेट खेळून स्वत:च्या कौशल्यावर विश्वास ठेवायचा आहे. दबाव झेलून सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्याची आहे”

Follow Us