इंग्लंडला नडणार, केएल राहुल पाठोपाठ आणखी एका खेळाडूचा इंग्लंडमध्ये धमाका, अर्धशतकांची हॅट्ट्रिक
टीम इंडिया पाच कसोटी सामन्यांची सीरीज खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. तिथे सुरु असलेल्या अनऑफिशियल टेस्ट मॅचमध्ये केएल राहुल पाठोपाठ आणखी एका खेळाडूने जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. त्याने अर्धशतकांची हॅट्ट्रिक केली आहे. विराट कोहली, रोहित शर्माशिवाय खेळणारी युवा टीम इंडिया या सीरीजमध्ये दमदार प्रदर्शन करेल, असे संकेत मिळत आहेत.

इंग्लंड दौऱ्यात भारतीय खेळाडूंकडून दमदार कामगिरी करण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या इंग्लंड लायन्स विरुद्ध इंडिय ए अशी अनऑफिशियल टेस्ट मॅच सुरु आहे. या सामन्यात इंडिया ए चा विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेलने आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडलाय. IPL मधील शानदार प्रदर्शनानंतर तो इंग्लिश भूमीवर खोऱ्याने धावा करतोय. इंग्लंड लायन्स विरुद्ध अनऑफिशियल टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये तो शानदार अर्धशतकी इनिंग खेळला. याआधी त्याने पहिल्या टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. ध्रुव जुरेलने इंग्लंडमध्ये हाफ-सेंच्युरीची हॅट्ट्रिक केली आहे. पहिल्या टेस्टमध्ये अवघ्या 6 रन्सनी त्याचं शतक हुकलं होतं. त्याची बॅट ज्या पद्धतीने चालतेय, ते इंग्लिश गोलंदाजांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी पुरेस आहे.
ध्रुव जुरेलने इंग्लंड लायन्स विरुद्ध दुसऱ्या अनऑफिशियल टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी शानदार बॅटिंग केली. त्याने 87 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. त्याने केएल राहुलसोबत (116) तिसऱ्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. याआधी जुरेलने इंग्लंड लायन्स विरुद्ध पहिल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये 120 चेंडूत 11 चौकार आणि एका सिक्ससह 94 धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये 53 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 53 धावा केल्या होत्या.
प्लेइंग इलेव्हनमध्ये दावेदारी मजबूत केलीय
इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्याच्या सीरीजमध्ये ध्रुव जुरेलला टीम इंडियात दुसरा विकेटकीपर फलंदाज म्हणून निवडण्यात आलं आहे. तो सध्या ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, त्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये आपली दावेदारी मजबूत केली आहे. ध्रुव जुरेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली, तर तो याचा फायदा उचलेलं. कारण त्याने इंग्लिश वातावरणाशी बऱ्याच प्रमाणात जुळवून घेतलय.
आयपीएल सीजनमध्ये किती धावा केल्या?
ध्रुव जुरेल यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला. त्यांचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं. पण जुरेलने राजस्थानकडून खेळताना शानदार फलंदाजी केली. त्याने 14 सामन्यात 13 इनिंगमध्ये 37.00 च्या सरासरीने 333 धावा केल्या. यात दोन अर्धशतकं आहेत. हाच फॉर्म त्याने इंग्लंडमध्ये कायम ठेवला आहे.
