विराटशी वादानंतर पंचांनी दरवाजा तोडला, राग शांत झाल्यावर भरपाई दिली

विराटशी वादानंतर पंचांनी दरवाजा तोडला, राग शांत झाल्यावर भरपाई दिली

बंगळुरु : यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक सामने पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे चर्चेत राहिले. त्यामुळे कर्णधार आणि पंचांमध्ये अनेकदा शाब्दिक वाद पाहायला मिळाले. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली आणि पंचांमध्ये वाद झाला. यानंतर संतापलेल्या पंचाने पवेलियनमध्ये गेल्याने दरवाजाला जोरात लाथ मारली, ज्यात दरवाजाचं नुकसान झाल्याचं बोललं जातंय.

4 मे रोजी बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. हैदराबादसाठी हा ‘करो या मरो’चा सामना होता. कारण, या विजयासोबतच हैदराबादचं प्लेऑफमधील स्थान पक्क झालं असतं. दुसरीकडे या मोसमात खराब कामगिरी राहिलेल्या बंगळुरुने अखेरच्या सामन्यात विजय मिळवला आणि हैदराबादचा मार्गही खडतर केला. याचवेळी पंच नीजल लाँग यांनी उमेश यादवचा एक चेंडू नो बॉल दिल्यामुळे विराट पुढे आला आणि वाद सुरु झाला.

50 वर्षीय नीज लाँग आयसीसीच्या एलीट पॅनलमध्ये सहभागी आहेत. पण यावेळी त्यांचा निर्णय चुकला होता. टीव्ही रिप्लेमध्ये पाहिल्यानंतर ही चूक लक्षात आली. नियमानुसार हा नो बॉल नव्हता. त्यामुळे विराटने या निर्णयाचा विरोध केला. पण पंचांनी निर्णय मागे घेतला नाही.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, डाव संपातच नीजल लाँग थेट पवेलियनमध्ये गेले आणि रागात दरवाजावर जोरात लाथ मारली. यामुळे दरवाजाचं नुकसान झालं. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने प्रकरणाचा तपास मॅच रेफरी नारायम कुट्टी यांच्याकडे दिला. यानंतर नुकसान भरपाई म्हणून पाच हजार रुपये वसूल करण्यात आले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI